कणकवलीत बांधकाम परवाना, भोगवटा प्रमाणपत्रात गोलमाल

कणकवलीत बांधकाम परवाना, भोगवटा प्रमाणपत्रात गोलमाल

*कणकवलीत बांधकाम परवाना, भोगवटा प्रमाणपत्रात गोलमाल…*

*कन्हैया पारकर; मुख्याधिकारी, नगररचनाप्रमुखांचे बेकायदा बांधकामांना अभय…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

नगर पंचायत मुख्याधिकारी विनोद डवले आणि नगररचना प्रमुख मयूर शिंदे हे दोघे बांधकाम व्यावसायिकांना हाताशी धरून बेकायदा बांधकामांना अभय देत आहेत. नगर पंचायतीकडून चुकीची भोगवटा प्रमाणपत्रे देण्यात येत आहेत. बांधकामांसंबंधीचा आराखडा आणि नकाशा मागितला असता, नगरसेवकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. शासनाच्या विकास नियंत्रण नियमावलीचे राजरोस उल्लंघन केले जात असल्याचा आरोप नगरसेवक कन्हैया पारकर यांनी आज केला. तसेच या दोहोंविरोधात विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आल्याचीही माहिती श्री.पारकर यांनी दिली.
श्री.पारकर म्हणाले, जिल्ह्याच्या मध्यवर्ती असणार्‍या कणकवली शहराची व्यापारी दृष्ट्या चांगलीच प्रगती झाली आहे. त्यामुळेच बांधकाम व्यवसाय सुद्धा शहरात बहरला आहे. मात्र त्याचाच गैरफायदा मुख्याधिकारी विनोद डवले आणि नगर रचना प्रमुख मयूर शिंदे या दोघांकडून घेतला जात असल्याचा आमचा संशय आहे. बांधकाम व्यावसायिकांना हाताशी धरून तोडपाणी करून बेकायदा बांधकामांना अभय दिले जात आहे. चुकीची भोगवटा प्रमाणपत्रे दिल्याने शासनाच्या विकास नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन होत आहे. अनेक बांधकामांना अशी भोगवटा प्रमाणपत्रे देण्यात आल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. तसेच कणकवली शहरामध्ये अनधिकृत बांधकामांना ऊत आला आहे याला जबाबदार हे अधिकारी आहेत
पारकर म्हणाले, मी स्वतः त्या माहिती मधील एका बांधकामाची परवानगी, बांधकामाचा नकाशा तसेच भोगवटा प्रमाणपत्र यांची मागणी नगरसेवक या नात्याने मी केली होती. मात्र या दोन्ही अधिकार्‍यांनी माहिती देण्यास नकार दिला. वास्तविक मी नगरसेवक आहे. या शहराचा विश्वस्त म्हणून माझ्याच कार्यालयात मलाच माहिती देण्यास टाळाटाळ करणारे हे अधिकारी सामान्य माणसाला काय वागणूक देत असतील याची कल्पनाही करवत नाही.
ते म्हणाले, नकाशा, परवाना आणि भोगवटा प्रमाणपत्र देताना मोठा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आम्हाला संशय आहे. अनेक नागरिकांनी तशा तक्रारी केल्या आहेत. शिवाय हे दोन्ही अधिकारी आपल्या वर्तणुकीतून त्या संशयाला पुष्टी देत आहेत. त्यामुळे त्यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. या दोन्ही अधिकार्‍यांची सखोल चौकशी केल्यानंतर शहरातील असे अनेक गैरप्रकार उघडकीस येतील अशी आम्हाला खात्री आहे. त्यासंबंधातील पुरावे आवश्यकता भासल्यास आम्ही सादर करणार आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!