*कोकण Express*
*नडगिवे येथील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विविध उपक्रमांनी रक्षाबंधन दिवस साजरा*
*कासार्डे;संजय भोसले*
नडगिवे येथील आदर्श एज्युकेशन सोसायटीच्या नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विविध उपक्रमांनी रक्षाबंधन दिवस साजरा करण्यात आला.
कणकवली तालुक्यातील नडगिवे येथील आदर्श एज्युकेशन सोसायटीच्या नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध उपक्रमांनी रक्षाबंधन दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी परस्परांना सन्मानपूर्वक स्वतःच्या हस्तकलेतून साकारलेल्या आकर्षक राख्यांनी ऋणानुबंध बांधले. अवघे विद्यालयाचे प्रांगण अद्वैत आणि उत्साहाने भारले गेले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्तकलेतून निर्माण केलेल्या मनमोहक राख्या पर्यावरणाशी सख्य राखणाऱ्या होत्या. रक्षाबंधनाच्या या उपक्रमात नर्सरी ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.
भावाने बहिणीचे रक्षण करावे या उद्देशाने बहिण भावाला राखी बांधते हा परंपरागत मानस अधिकतर समाजात जोपासला जातो. यातून मूलतः रक्षण करणाऱ्यास राखी बांधून ऋणानुबंध व्यक्त करण्याची भूमिका रक्षाबंधनामध्ये असते. भूमी आणि पर्यावरण हे सर्व जीवांचे सदैव रक्षण करीत असतात. सर्व जीवांमध्ये मनुष्य याला अपवाद नाही. भूमी आणि पर्यावरण यांचा संयुक्त घटक असलेला एक जीव म्हणजे सगा-सोयरा वृक्ष आहे. याच जाणिवेतून नडगिवे येथील आदर्श एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोरे तसेच नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल या विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी मिळून विद्यालयाच्या प्रांगणातील आम्रवृक्षाला अद्वैतोत्साहाने ऋणानुबंधाची राखी बांधली. वृक्ष जसे पर्यावरणाशी मेळ साधून आपल्या आरोग्याचे तसेच विविध अंगानी आपले संरक्षण करतात तशीच आपलीही जबाबदारी आहे की आपणही सहकार तत्त्वाने कर्तव्यदक्षतेने वृक्षांचे व विविधांगांनी पर्यावरणाचेही संरक्षण करायला हवे. या विचारांचा आचार साधून अंमल करीत विद्यालयाच्या अंगणातील आम्रवृक्षाला विद्यालयाच्यावतीने प्रातिनिधिक रक्षाबंधन करण्यात आले तसेच वृक्ष-वेली आणि पर्यावरण यांचे संरक्षण करण्याची शपथ घेण्याचा यथासांग विधी सोहळाही यावेळी पार पडला. या शपथविधिंतर्गत विद्यालयातील विद्यार्थ्यांसह सर्व उपस्थितांनी वृक्ष-वेली आणि पर्यावरणातील अन्य उपकारक घटकांचे संरक्षण करण्याची शपथ घेतली. या उपक्रमातून विद्यालयाने एक उदात्त संदेश प्रेरित केला आहे.