*कोकण Express*
*नैतिक जबाबदारी स्वीकारून अखंड लोकमंच कातकरी समाजाचे करत असलेले काम प्रेरणादायी;तहसीलदार आर.जे.पवार*
*जागतिक आदिवासी दिनानिमत्ताने दहावी उत्तीर्ण कातकरी समाजातील मुलीचा झाला सत्कार
*कणकवली ःःप्रतिनिधी*
आदिवासी – कातकरी समाज हा शाळा, पुस्तकं, शिक्षण यांच्यापासून आजही कोसो दूर आहे. अशा समाजातील एका विद्यार्थिनीला शाळेत जाण्यासाठी प्रवृत्त करून तिला उच्चशिक्षित होण्याची प्रेरणा अखंड लोकमंच सारखी संस्था देत आहे. कु. शिल्पा पवार सारख्या मुलीने दहावीच्या एसएससी बोर्डात गुणवंत बनवण्यासाठी मेहनत घेतली आणि यश संपादन केले.तिच्या या यशाची पुनरावृत्ती शिक्षणाच्या प्रत्येक वर्गात कातकरी समाजातील मुलांनी करावी. असे आवाहन कणकवली तहसीलदार आर.जे.पवार यांनी केले. समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी आणि व्यसनमुक्ततेसाठी नैतिक जबाबदारी स्वीकारून अखंड लोकमंच सिंधुदुर्ग ही संस्था करत असलेले काम निश्चितच समाजाला प्रेरणा देणारे आहे असे ही ते म्हणले.
आदिवासी दिनानिमित्त अखंड लोकमंच सिंधुदूर्ग च्या श्रमिक मुक्तीवेध शाखेच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमत्ताने कणकवली स्वामी आर्ट येथे कु. शिल्पा पवार या विद्यार्थिनीच्या सत्कार कणकवली तहसीलदार आर.जे. पवार यांच्या हस्ते करण्यात आला. कुमारी शिल्पा पवार ही कातकरी समाजातील पहिली एसएससी गुणवंत विद्यार्थीनी आहे. या सत्कार सोहळ्याला तहसीलदार आर.जे.पवार यांच्यासह डॉक्टर विद्याधर तायशेटे, व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, अखंडचे अध्यक्ष नामानंद मोडक, संस्थेचे पदाधिकारी व्ही.के.सावंत, बाळू मिस्त्री,संतोष राऊळ, विनायक साबळे, राजेश कदम, संतोष कांबळी,निलेश पवार, कवयित्री सरिता पवार, किरण कदम, शैला कदम, शिक्षक किशोर कदम,कल्पना मलये,कातकरी प्रतिनिधी बबन पवार यांच्या सह कातकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नाटक आणि चित्रपट आभिनेता निलेश पवार यांनी आपले विचार मांडताना म्हणेल,आज एकविसाव्या शतकात जगामध्ये लोकशाही मूल्य रुजत आहेत. लोकशाही मूल्यावर चालणारी राष्ट्रे ताकतवान आणि बलवान आहेत .जगामध्ये त्यांचं अमूल्य स्थान अधोरेखित होतं . त्याची खरी रुजवात ही नैसर्गिक जगण्यात येते .आणि निसर्गाच्या नियमानुसार आणि नैसर्गिक जगण्यातून समता स्वातंत्र्य बंधुतेचे आदर्श जीवनाचे मॉडेल हे आदिवासींच्या जीवनात आणि संस्कृतीत सापडते. त्यामुळे आज आम्ही निर्माण केलेली लोकशाही व्यवस्था याचे मूळ आदिवासींच्या जगण्यात आणि संस्कृतीत आहे.वसाहतवाद आणि जागतिकीकरण तसंच भांडवलशाही यामुळे ज्या नैसर्गिक जगण्यातून आदिवासींनी आपणाला लोकशाहीचं सहजीवनाचं मॉडेल बहाल केलं त्याच आदिवासींना आता शोषणाला बळी पडणं भाग होत आहे .संयुक्त राष्ट्र संघाने याची जाणीव ठेवीन ९ ऑगस्ट हा दिन जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्याचे आयोजन केले.त्यानुसार जगभरात या दिवशी आदिवासी दिन उत्साहात साजरा होतो. अखंड लोकमंच सिंधुदुर्ग च्या माध्यमातून घेतलेला हा उपक्रम सुद्धा समाजाला प्रेरणा देणारा आहे असे मत यावेळी निलेश पवार यांनी व्यक्त केले.