पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न करा

पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न करा

*कोकण Express*

*पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न करा*

*जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांचे जिल्हावासियांना आवाहन
गणेशोत्सव नियोजन आढावा बैठक*

*सिंधुदुर्ग :* 

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्त जिल्ह्यातील आपल्या गावी येत असतात. या गणेशभक्तांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची विशेष दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी. या कालावधीत वाहतूक सुरळीत राहील याची विशेष काळजी घ्यावी. नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत यांनी विविध स्पर्धांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केली.
गणेशोत्सव कालावधीत उपययोजना, बंदोबस्त व कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज बैठक घेण्यात आली. बैठकीला पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, वंदना खरमाळे, प्रशांत पानवेकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, सार्वजनिक गणेश मंडळांना ध्वनी प्रदूषणाची व्यवस्थित माहिती देण्यात यावी. कायदा व सूव्यवस्थेच्या दृष्टीने फिरती पोलीस पथकांचे नियोजन करावे. रहदारीच्या ठिकाणी वाहनांची कोंडी होणार नाही, महामार्गावर वाहतुकीस अडथळा होणारी घटना घडल्यास क्रेन व जेसीबीची सोय करावी. महामार्गानजीकचे ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे खासगी रुग्णवाहिकांचे संपर्क क्रमांक असावेत. गणेशभक्तांसाठी विशेष रेल्वे येणार आहेत. त्यासाठी परिवहन महामंडळाने तेथून गावी जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करावी. महावितरणने वीज व्यवस्था सुरळीत राहील यासाठी साधनसामग्री, मनुष्यबळ याची व्यवस्था करावी. गणेश मूर्ती आगमन मार्ग तसेच विसर्जन मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती करुन घ्यावी. सर्वच यंत्रणांनी समन्वयाने गणेशोत्सव उत्साहात आणि चांगल्या पद्धतीने पार पडेल यासाठी प्रयत्न करावेत.
पोलीस अधिक्षक दाभाडे म्हणाले, गणेशोत्सव पूर्व २ दिवस आधी विशेषतः पोलीस महामार्ग सुरक्षा पोलीस, वाहतूक पोलीस यांनी दक्ष राहून वाहतुकीची कोंडी होणार नाही याचे नियोजन करावे. रात्रीच्या वेळी वळणांवर घाट मार्गावर रिफ्लेक्टर बसवावेत. कोणतेही अपघात होणार नाहीत याची दक्षता घेणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाने आपल्या रुग्णवाहिका तैनात ठेवाव्यात.
निवासी उपजिल्हाधिकारी भडकवाड म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग, महामार्ग प्राधिकरण यांनी विशेषतः घाट मार्गांबाबत दक्ष राहून तात्काळ दुरुस्तीची कामे सुरु करावीत. रस्त्यावरील खड्डे भरून घ्यावेत. काही कारणास्तव गणेशभक्तांना घेऊन येणाऱ्या रेल्वे थांबल्यास त्यांच्या खाण्याची व पाण्याची सोय रेल्वे विभागाने करावी. महामार्गानजीकच्या ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी आपत्कालीन सुविधा ठेवावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!