*कोकण Express*
*कोकणवासीय गणेशभक्तांसाठी यावर्षीही मोफत “मोदी एक्स्प्रेस”*
*आमदार नितेश राणे यांचा उपक्रम*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांना कोकणात गणेशोत्सवासाठी सुरक्षित आणि वेळेत जाता यावे यासाठी ‘मोदी एक्सप्रेस’ विशेष गाडी सोडली जाणार आहे. ही गाडी २९ ऑगस्ट रोजी दादर स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वरून सकाळी १० वाजता कणकवलीसाठी सुटेल. गेल्या वर्षीही गणेशोत्सवात ‘मोदी एक्सप्रेस’ नावाने कोकणसाठी विशेष गाडी सोडण्यात आली होती. गेल्या वर्षी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची केंद्रात मंत्रिपदी निवड झाल्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दादर येथून ‘मोदी एक्सप्रेस’ला हिरवा झेंडा दाखवला होता. यावेळीही भाजप आमदार नितेश राणे यांच्या सहकार्याने ही गाडी २९ ऑगस्ट रोजी सोडण्यात येईल. दादरहून सुटल्यानंतर वैभववाडी आणि कणकवली या ठिकाणी मोदी एक्सप्रेस थांबणार आहे. या प्रवासादरम्यान एक वेळचे जेवण मोफत देण्यात येणार आहे. तसेच आरती संग्रहाचे पुस्तकही यावर्षी देण्यात येणार आहे. कणकवली, देवगड आणि वैभववाडी या तीन तालुक्याचे भाजपाचे तालुकाध्यक्ष यांना या रेल्वेने प्रवास करण्याकरिता संपर्क साधण्याचे आवाहन आमदार राणे यांनी केले आहे.