कणकवलीत सात हजार घरांवर तिरंगा फडकवणार

कणकवलीत सात हजार घरांवर तिरंगा फडकवणार

*कोकण Express*

*कणकवलीत सात हजार घरांवर तिरंगा फडकवणार*

*१७ प्रभागांत ध्वजाचे होणार वितरण ; समीर नलावडे*

*कणकवली ः प्रतिनिधी*

स्वातंत्र्याचा अमृत महोत्‍सवांतर्गत कणकवली शहरातील सर्व ७ हजार ५६५ घरांवर १३ ते १५ ऑगस्ट या दरम्‍यान तिरंगा फडकणार आहे. याअनुषंगाने नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात शहरातील सर्व १७ प्रभांगांमध्ये तिरंगा वितरणाचे नियोजन निश्‍चित केले.
या बैठकीला उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, प्राचार्य राजेंद्रकुमार चौगुले, माजी नगरसेवक बंडू गांगण, प्रा. सुरेश पाटील, रविराज प्रधान, अच्युतराव वनवे, रसिका शेट्ये, सायली गुरव, वर्षा करंबेळकर, कल्पना मलये, अरविंद गवळी, नगरपंचायत स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, सतीश कांबळे, रुचिता ताम्हणकर, ध्वजा उचले, रसिका उपरकर आदी उपस्थित होते.
शहरातील सर्व घरांमध्ये वाटप करण्यासाठी आवश्यक असलेले ७ हजार ५६५ झेंडे आणि त्यासाठीच्या लागणाऱ्या काठ्या नगरपंचायत उपलब्ध करणार आहे. त्‍याचप्रमाणे प्रत्येक प्रभागांमध्ये महाविद्यालय आणि हायस्कूलचे विद्यार्थी, त्यांच्यासोबत नगरपंचायत कर्मचारी असे पथक नियुक्त केले आहे. यांच्या माध्यमातून ध्वजाचे वितरण केले जाणार असल्‍याची माहिती श्री.नलावडे यांनी दिली.
दरम्‍यान या नियोजन बैठकीमध्ये कणकवली कॉलेजचे एनसीसी व एनएसएसचे मिळून १३६ तर एस एम हायस्कूल व विद्यामंदिर हायस्कूलची प्रत्येकी ३४ असे मिळून एकूण २०४ प्रत्येक घरात ध्वजाचे वितरण करण्यासाठी निश्‍चित करण्यात आले. देशभरात १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे ११ व १२ ऑगस्ट रोजी शहरात तिरंगा ध्वजाचे वितरण पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी प्रशासनाला दिल्या.

जनजागृती रॅलीचे नियोजन
प्रत्येक प्रभागात १२ विद्यार्थी व त्यांच्यासोबत नगरपंचायत कर्मचारी अशा प्रकारे ही पथकांची रचना असणार आहे. कणकवली कॉलेजच्यावतीने सोमवारी कणकवली शहरातून ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या जनजागृतीसाठी रॅली काढण्यात येणार आहे. याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. तर कणकवली शहरातील प्रत्येक अंगणवाडी असलेल्या भागांमध्ये अंगणवाडीमार्फतही जनजागृती रॅली काढण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!