*कोकण Express*
*दैनंदिन जीवनामध्ये विज्ञानाचे महत्त्व अनन्यसाधारण: प्रा. डॉ. राजश्री साळुंखे*
*कणकवली महाविद्यालयामध्ये मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया स्टुडन्ट युनिटचे उद्घाटन उत्साहात.*
*कणकवली ःःप्रतिनिधी*
वैज्ञानिक दृष्टिकोन समृद्ध होणे आवश्यक आहे. विज्ञान फक्त अभ्यासासाठी नाही तर ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आत्मसात करणे ही आवश्यक आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपल्यासमोर चांगले आदर्श असतील तरच आपले भविष्य चांगले घडू शकते असे मत प्रा. राजश्री साळुंखे, चेअरमन शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली यांनी व्यक्त केले. नुकतेच कणकवली कॉलेज कणकवली, सूक्ष्मजीवशास्त्र विभागामध्ये मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया स्टुडन्ट युनिट ची स्थापना करण्यात आली. उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले डॉ. संदीप साळुंखे, प्रा. डॉ. शामराव दिसले, प्रा. डॉ. बाळकृष्ण गावडे, डॉ. चैतन्य रावराणे, प्रा. सुरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. वैज्ञानिक प्रगती मोठ्या वेगाने होत चालली आहे. बदलत्या काळाबरोबर बदलत असताना आपले वेगळेपण जपणंही आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. चैतन्य रावराणे, यांनी विद्यार्थ्यांना प्रदेशांमध्ये असणाऱ्या शिक्षणाच्या व संशोधनाच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले. विविध राष्ट्राकडून दिल्या जाणाऱ्या छात्रवृत्ति व त्याठिकाणी प्रवेश कसा घ्यावा, याबाबत मार्गदर्शन केले.
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांची भूमिका महत्त्वपूर्ण होती आणि आहे. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ करत असलेल्या कार्यामुळे आपण आरोग्यदायी जीवन जगू शकतो असे मत डॉ. संदीप साळुंखे यांनी मांडले.
प्रा सुरेश पाटील यांनी मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांची उद्दिष्टे भविष्यामध्ये सूक्ष्मजीवशास्त्र विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम व सूक्ष्मजीवशास्त्र विषयांमध्ये उपलब्ध असणाऱ्या संधी याबाबत आढावा घेतला. मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया स्टुडन्ट युनिट कणकवली कॉलेज अध्यक्ष कु. आम्रपाली रणदिवे हिने सोसायटी मार्फत कसे कार्य केले जाईल याबाबत माहिती दिली. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन प्रा सुरेश पाटील, प्रा. गीतांजली नार्वेकर, प्रा. अरविंद उमरीकर, प्रा. पल्लवी गोखले, श्री. समीर तावडे, श्री गुरु सावंत, श्री. प्रमोद चव्हाण, श्री. मंगेश भोगले व सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सानिका कासले व सिद्धी पालव यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी 130 विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी आभार कु. सेजल शेट्टी हिने मानले.