*कोकण Express*
*ज्याचे हृदय आईचे असते तेच साहित्य निर्माण करू शकतात*
प्रा. महादेव नारिगकर
*फोंडाघाट ःःप्रतिनिधी*
कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट मध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. लोकमान्य टिळक पुण्यतिथी, मुन्शी प्रेमचंद व अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. या तीनही महनीय व्यक्तींचे प्रतिमा पूजन करण्यात आले.
प्रास्ताविकामध्ये हिंदी विभाग प्रमुख डॉ. संतोष रायबोले म्हणाले की, या तीनही व्यक्तीनी समाज सुधारण्याचे काम केले. त्यांच्या लेखणीने आपल्या विचारांची पेरणी समाजात करुन जागृत समाज निर्माण केला.
त्यानंतर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.विनोद पाटील म्हणाले की लोकमान्य टिळक यांचे स्वातंत्र्य लढ्यातील व चळवळीतील योगदान फार मोठे आहे. त्यांच्या लेखणीला तत्कालीन सरकार घाबरत होते. अण्णाभाऊ साठे यांची साहित्य संपदा फार मोठी आहे. दीनदलित, कष्टकरी समाजाचे त्यांनी आपल्या लेखणीतून प्रतिनिधित्व केले. त्यामुळे समाज जीवनाच्या प्रश्नांना वाचा फोडली आणि खऱ्या अर्थाने आपल्या देशाच्या समाजाचे दर्शन जगाला घडवले. मून्शी प्रेमचंद यांच्या साहित्याने तर प्रस्थापित समाजाच्या डोळ्यात जळजळीत अंजन घातले. समाजाची वेदना प्रत्यक्षात मांडली.
त्यानंतर विद्यार्थ्यांची मनोगते झाली. आपल्या प्रमुख मार्गदर्शनपर मनोगतात प्रा. महादेव नारिंगकर म्हणाले की ज्या तीनही व्यक्तींचे आपण स्मरण करत आहोत त्यांनी आपल्या जीवन काळात केलेले काम अलौकिक आहे. आपल्या क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली. स्वातंत्र्यासाठी लोकमान्य टिळकांनी खूप मोठे काम केले. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून माणसाच्या माणुसकीला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे काम केले. प्रेमचंद यांनी तर साहित्यातून समाज दर्शन घडवले. समाजाच्या वेदनेचे मूळ त्यानी पकडले होते. आर्थिक कुचंबनेतून सावरत त्यांनी लेखणीतून आपल्या विचारांची उंची गाठली. स्वतःच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगा हा विचार वाचकांच्या मनावर बिंबवला.आपणआपल्या मनाची गोष्ट विसरून दुसऱ्याची गोष्ट लक्षात ठेवतो. प्रेमचंद यांनी विशाल साहित्य संपदा निर्माण केली. त्यांचे विचार पारंपारिक समाज व्यवस्थेला फाटा देतात. त्यांच्या साहित्यातील प्रत्येक गोष्ट समाजाचे प्रतिनिधित्व घडवते. आपल्या भरकटलेल्या समाजाला प्रेमचंद यांचे साहित्य मार्गदर्शक ठरते. याच बरोबर भरकटलेल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन ही त्यांचे साहित्य करते. प्रत्येक साहित्यकृतीत अन्याय अत्याचारावर आवाज उठवलेला दिसतो. असे प्रतिपादन त्यांनी केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णु फुलझेले म्हणाले की, या तीनही व्यक्तींचे लेखन प्रेरणादायी आहे. धनपतराय श्रीवास्तव नावाचे मुन्शी प्रेमचंद झाले. टिळकानी अगदी कमी वयात शिक्षण संस्थांची स्थापना करून शिक्षित समाज रचनेचा पाया रचला. स्वातंत्र्य लढ्यातील योगदान फार मोठे आहे. गीता रहस्य हा ग्रंथ त्यांनी तुरुंगात लिहिला. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा धागा समाज सुधारणा हाच आहे. अशिक्षित असलेल्या अण्णांचे साहित्य जागतिक समाजाचे प्रतिनिधित्त्व करते. त्यानी अशिक्षित समाजातून पुढे येऊन शिक्षित समाजाची स्थापना केली. प्रेमचंद यांनी पारंपारिक समाज रचना बदलून आधुनिक वैचारिक समाज स्थापन केला. त्यांचे मार्गदर्शन साहित्यतून आपणांसमोर येते.
हा कार्यक्रम सांस्कृतिक व हिंदी विभागाच्यावतीनेआयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविशेखर रासम याने तर आभार वैभवी परब यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचा संपूर्ण कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्याने उपस्थित होते.