आचरा बायपास रस्त्याचा प्रश्‍न अंतिम टप्प्यात

आचरा बायपास रस्त्याचा प्रश्‍न अंतिम टप्प्यात

*कोकण Express*

*आचरा बायपास रस्त्याचा प्रश्‍न अंतिम टप्प्यात*

*नगरपंचायत ने केली १० लाख रूपयांच्या मोबदला रक्‍कमेची तरतूद*

*कणकवली ः प्रतिनिधी*

गेली बारा वर्षे रखडलेला कणकवली, आशिये, कलमठ, वरवडे असा आचरा बायपास रस्त्याचा प्रश्‍न अंतिम टप्प्यात आला आहे. या मार्गात येणारी पोस्ट खात्‍याची जागा नगरपंचायत भू संपादन प्रक्रियेद्वारे ताब्‍यात घेणार आहे. त्‍यासाठी १० लाख रूपयांच्या मोबदला रक्‍कमेची तरतूद नगरपंचायतीने केली आहे.त्‍यामुळे लवकरच ही जागा नगरपंचायतीच्या ताब्‍यात येऊन आचरा पर्यायी रस्ता खुला होणार आहे. हा रस्ता तयार झाल्‍यानंतर आशिये, कलमठ गावच्या विकासाला चालना मिळणार आहे. तसेच वाहन चालकांची वाहतूक कोंडीतूनही सुटका होणार आहे.
कणकवली-आचरा मार्गावरील कणकवली पटवर्धन चौक ते कलमठ बाजारपेठ हद्दीमध्ये वारंवार वाहतूक कोंडी होते. कणकवली आचरा रस्त्याला कलमठ, वरवडे, पिसेकामते, बिडवाडी, रामगड, आडवली, मालडी, श्रावण, बेळणे, पळसंब, चिंदर, त्रिंबक आदी अनेक गावे जोडली गेली आहेत. तसेच देवगड आणि मालवण तालुक्‍यांतील अनेक गावांत जाण्यासाठीही या मार्गावर वापर होतो. यातील कणकवली शहर ते कलमठ बाजारपेठ पर्यंतचा रस्ता कमी रुंदीचा असल्याने, तसेच या मार्गावर वाहनांची सातत्याने वर्दळ असल्याने सातत्‍याने वाहतूक कोंडी होते.
या वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी शहरातील एस.टी. बसस्थानक लगतची पोस्टाची जागा ते आशिये गाव, तेथून कलमठ ते वरवडे चव्हाण दुकान असा पर्यायी मार्ग काढण्यात आला. सन २००६ मध्ये या रस्त्याच्या कामाला मंजूरी मिळाली त्‍यामुळे पटवर्धन चौक ते वरवडे चव्हाण दुकान पर्यंतच्या मार्गाचा दर्जा ग्रामीण रस्ता असा झाला. सन २०१० पर्यंत या पर्यायी रस्त्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र पोस्ट खात्‍याच्या जागेचा अडसर आणि कलमठ गावातील ८८ जमीन मालकांना मोबदला रक्‍कम न मिळाल्याने हा रस्ता रखडला होता. दोन वर्षापूर्वी कलमठ गावातील जमीन मालकांना १ कोटी ७० लाख ३३३ हजार रूपयांचा मोबदला मंजूर झाला. त्‍यामुळे वरवडे ते कणकवली शहर हद्दीपर्यंत रस्त्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र कणकवली शहर हद्दीतील पोस्ट खात्‍याची जागा या रस्त्यामध्ये अडथळा ठरली होती.
कणकवली शहरात पोस्ट खात्‍याची इमारत उभी करण्यासाठी पोस्ट खात्‍याने बसस्‍थानकापासून काही अंतरावर ४० गुंठे क्षेत्र खरेदी केले होते. केंद्राकडून एक कोटीचा निधी मंजूर झाल्‍यानंतर येथे इमारत उभी करण्यासाठी नगरपंचायतीकडे परवानगी मागितली होती. मात्र नगरपंचायतीने परवानगी मिळाल्‍यानंतरही वर्षभर काहीच बांधकाम न झाल्‍याने नगरपंचायतीने ही परवानगी रद्द केली. त्‍यानंतर पोस्ट खात्‍याने पुन्हा बांधकाम परवानगी मागितली होती. यावेळी नगरपंचायत प्रशासनाने रस्त्यासाठी आवश्‍यक ते क्षेत्र सोडण्याची संमती दिल्‍यानंतरच परवानगी दिली जाईल अशी अट घातली. मात्र पोस्ट खात्‍याकडून जागा सोडण्याबाबत काहीही कार्यवाही झाली नाही. त्‍यामुळे पोस्ट खात्‍याच्या अखत्‍यारीत येणारी जागा विकत घेण्यासाठी नगरपंचायतीकडून पाेस्ट खात्‍याकडे गेली दहा वर्षे पत्रव्यवहार सुरू होता. परंतु केंद्राच्या अखत्‍यारीत येणाऱ्या पोस्ट खात्‍याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्‍यामुळे ५ ऑगस्‍ट २०२ रोजी नगरपंचायतीने पाेस्ट खात्‍याची जागा भूसंपादन करून ताब्‍यात घेण्याचा ठराव केला. त्‍याप्रमाणे आवश्‍यक त्‍या रस्त्याची जागा ताब्‍यात घेण्याचा प्रस्ताव देखील जिल्‍हाधिकाऱ्यांकडे सादर केला.
पोस्ट खात्‍याच्या अखत्‍यारीत येणारी जागा भूसंपादन करण्यासाठी जिल्‍हाधिकाऱ्यांनी कणकवली प्रांताधिकाऱ्यांची भूसंपादन अधिकारी म्‍हणून नियुक्‍ती केली आहे. पुढील काही दिवसांत राष्‍ट्रीय महामार्ग ते पोस्ट खात्‍याच्या अखत्‍यारीत येणाऱ्या जागेची संयुक्‍त मोजणी होणार आहे. या मोजणीत रस्त्यासाठी आवश्‍यक ते क्षेत्र तसेच जागेत असणारी झाडे व इतर मालमत्ता यांची नोंद घेऊन त्‍यानुसार मोबदला रक्‍कम निश्‍चित केली जाणार आहे. हा मोबदला पोस्टखात्‍याला वर्ग केल्‍यानंतर ही जागा नगरपंचायतीच्या ताब्‍यात दिली जाणार आहे. पुढील दोन महिन्यात या जागेचा ताबा मिळाला तर डिसेंबर २०२२ पर्यंत आचरा पर्यायी रस्त्याचे काम सुरू केले जाणार असल्‍याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे आणि उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली.
आचरा बायपास रस्त्यामुळे विकासाला चालना कणकवली शहरातून अशिये, कलमठ ते वरवडे असा नवा मार्ग तयार होणार आहे. गडनदी पात्रालगत असलेल्‍या या मार्गावरमुळे कणकवली शहरासह आशिये, कलमठ गावांतील नागरिकांना नवा रस्ता उपलब्‍ध होणार आहे. त्‍यामुळे येथील विकासालाही चालना मिळणार आहे. याखेरीज वाहन चालकांचीही वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
आचरा पर्यायी रस्ता दहा मिटरचा होणार
आचरा पर्यायी रस्त्याचे काम हायब्रीड ॲन्युइटी धोरणानुसार करण्यात येणार आहे. त्यानुसार रस्त्याचा डांबरी पृष्ठभाग १० मीटर रुंदीचा असणार आहे. तर प्रत्यक्षात रस्त्याचे भूसंपादन ३० मीटर रूंदीचे आहे. कणकवली शहरातील ४०० मीटर जमीन रस्त्यात बाधित होणार आहे. मात्र, त्याचे भूसंपादन १२ मीटर नुसार करण्यात येणार आहे.
गेल्‍या दहा वर्षाच्या प्रयत्‍नानंतर पोस्ट खात्‍याची जागा संपादन करण्याची कार्यवाही आता सुरू झाली आहे. लवकरच आवश्‍यक त्‍या क्षेत्राची माेजणी होऊन ही जागा नगरपंचायतीच्या ताब्‍यात येणार आहे. भूसंपादनासाठी १० लाख रूपयांची तरतूद केली असून आणखी रक्‍कम लागल्‍यास त्‍याचीही तरतूद आम्‍ही केली आहे. अशी माहिती श्री हर्णे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!