*कोकण Express*
*उद्या १ ऑगस्ट रोजी कोकण विभागाचे नियोजित रिक्षा बंद आंदोलन स्थगित*
*कासार्डे;संजय भोसले*
रिक्षा चालक मालक संघटनेच्या सर्व प्रलंबित मागण्या व आंदोलनाची दखल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महासंघाच्या शिष्टमंडळास बोलवून सकारात्मक चर्चा केली व येत्या पंधरा दिवसांत बैठक घेऊन रिक्षा चालक मालक संघटनेच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.त्यामुळे उद्या १ ऑगस्ट रोजी कोकण विभागाचे नियोजित रिक्षा बंद आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर, कार्याध्यक्ष संतोष नाईक, खजिनदार जितेंद्र पवार, सहसचिव सुधीर पराडकर यांनी दिली आहे.
रिक्षा चालक मालक संघटनेच्या प्रलंबित मागण्या आणि इंधनाचे वाढते भाव याविरोधात न्याय मागण्यांसाठी १ ऑगस्ट रोजी रिक्षा बंद आंदोलनाची हाक कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाने दिली होती.या संघटनेमध्ये ठाणे,रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांचा समावेश आहे.याबाबत संघटनेच्या वतीने याबाबत शासन व प्रशासनाला निवेदन देऊन लक्ष वेधले होते आणि आंदोलनात्मक पवित्रा घेतला होता.
अखेर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः तातडीने लक्ष घालून संघटनेच्या शिष्टमंडळास भेटण्याचे निमंत्रण दिले.त्याबाबत शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यां समवेत बैठक होऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली.तसेच येत्या पंधरा दिवसांत संघटनेच्या पदाधिकाऱ्यां सोबत स्वतंत्र बैठक घेऊन प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिल्याने अखेर उद्या १ ऑगस्ट रोजी कोकण विभागाचे नियोजित रिक्षा बंद आंदोलन स्थगित आले आहे.अशी माहिती कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर, कार्याध्यक्ष संतोष नाईक, खजिनदार जितेंद्र पवार, सहसचिव सुधीर पराडकर यांनी दिली आहे.