*कोकण Express*
*नांदगाव जिल्हा परिषद सदस्य पदासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव इच्छुक असल्याची चर्चा*
*कासार्डे:संजय भोसले*
नांदगाव जिल्हा परिषद पदासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव हे इच्छुक असून लोकआग्रहास्तव सदरचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गेल्या काही वर्षांपासून राजेश जाधव हे तळेरे – कासार्डे पंचक्रोशीतील सामाजिक कार्यात सक्रियपणे कार्यरत आहेत. आपल्या खास कार्यशैलीच्या आधारे सर्वसामान्य नागरिकांच्या विविध सामाजिक समस्यांना लोकशाही व संविधानिक मार्गाने वाचा फोडून त्याबाबत संबंधितांना नियमोचितरीतीने तात्काळ दखल घेण्यास व कायदेशीर उपायोजना करण्यास भाग पाडण्यात त्यांचा हातखंडा आहे.तसेच शासन आणि प्रशासनाच्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजना देखील गरजू व पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचे उल्लेखनीय काम ते करीत आलेले आहेत.
याच सामाजिक कार्याच्या जोरावर व सर्वसामान्य जनतेच्या न्याय, हक्क, अधिकार व मागणी यांवर प्रकाशझोत टाकण्याच्या प्रामाणिक हेतूने त्यांनी सन २०१९ सालची लोकसभेची निवडणूक रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून स्वबळावर लढवली होती.सदर निवडणुकीत जरी ते पराभूत झाले असले तरी त्यांनी दखलपात्र अशी सुमारे १०००० मते मिळवून स्थानिक मतदारांचा विश्वास संपादन केला आहे.
ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या मानवाधिकार संरक्षण संघटनेवर ते कणकवली तालुका उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असून निसर्गमित्र परिवार या पर्यावरणप्रेमी संस्थेच्या सचिवपदी अशा अनेक सामाजिक संस्थावर देखील ते कार्यरत आहेत.
समाजातील विविध स्तरांतील सर्वसामान्य नागरिकांच्या शिक्षण,आरोग्य, वीज, पाणी, रस्ते इ. मूलभूत सोयीसुविधा यांबाबतच्या समस्या निर्मूलनासह मानवाधिकाराच्या संरक्षणासाठी ते संबंधित शासन आणि प्रशासनाशी दुवा साधून व वेळ प्रसंगी आंदोलनात्मक पवित्रा घेऊन सदैव कार्यतत्पर असतात. समाजातील विविध घडामोडीवर त्यांचा बारकाईने लक्ष असून राजकारणापेक्षा ते समाजकारणाला अत्याधिक महत्व देतात.यामुळेच ते सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असलेले सामाजिक कार्यकर्ते व उदयोन्मुख प्रबळ नेतृत्व म्हणून अल्पावधीतच नावारूपास येऊन लोकप्रिय झाले आहेत.
नवनिर्वाचित नांदगाव जिल्हा परिषद मतदार संघातील समाविष्ट गावांशी त्यांचा चांगला जनसंपर्क असून सदरचा जिल्हा परिषद मतदार संघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाला असल्याने या संधीचा लाभ घेत जनसेवा करण्याचा त्यांचा प्रामाणिक मानस असल्याचे सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी स्पष्ट केले आहे.