*कोकण Express*
*कठीण काळ शिवसेनेला संधी समजा व काम करा!*
*शिवसेना, युवासेनेच्या नेत्यांचे जिल्ह्यातील युवा सैनिकांना आवाहन*
*कणकवली मतदारसंघात युवासेना गाव निहाय दौरे करणार: सुशांत नाईक*
शिवसेनेला जरी कठीण काळ असला तरी युवा सैनिकांनी पक्ष वाढीसाठी ही संधी समजा व काम करा. शिवसेना वाढीसाठी युवा सैनिकांनी स्वतः जबाबदारी घेऊन काम सुरू करा. आलेले संकट हे आव्हान समजून युवा सेनेच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे हात बळकट करा. असे आवाहन शिवसेना सचिव सुरज चव्हाण व युवा सेना सचिव वरून सरदेसाई यांनी केले. शिवसेना भवन येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली विधानसभा मतदारसंघातील युवा सेनेच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी युवासेना वाढीसाठी कणकवली विधानसभा मतदारसंघात नियोजन करण्यात आले असून, युवासेना गावनीहाय दौरे करणार आहे. या दौऱ्यांच्या माध्यमातून कणकवली मतदारसंघात युवा सेना आपली ताकद दाखवील असा विश्वास श्री नाईक यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
मुंबई शिवसेना भवन येथे युवासेनेच्या कणकवली विधानसभा मतदार संघाची बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीला शिवसेना सचिव सूरज चव्हाण, युवासेना सचिव वरून सरदेसाई, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवा सेना देवगड तालुकाप्रमुख निनाद देशपांडे, गणेश गावकर, गणेश वाळके, कणकवली तालुका प्रमुख ललित घाडीगावकर, गीतेश कडू, उत्तम लोके, युवा सेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, सिद्धेश् राणे, वैभववाडी तालुका प्रमुख रोहित रावराणे, रोहित पावसकर आदि उपस्थित होते.
शिवसेना वाढीसाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आदित्य ठाकरे एक ऑगस्टला येणार आहेत. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा युवा सेनेची ताकद दाखवून द्या असे आवाहन यावेळी वरून सरदेसाई यांनी केले. याप्रसंगी बोलताना युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघातील युवा सेने ची ताकद वाढविण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. एका दिवशी एक विभाग याप्रमाणे गावनिहाय दौरे निश्चित केले गेले आहेत. व लवकरच या दौऱ्यांच्या माध्यमातून युवा सेना व शिवसेना बळकट करण्यात येईल असे सांगण्यात आले. युवा सेनेच्या माध्यमातून गावनीहाय शिवसेनेच्या बेसिक पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या जाणार आहेत. जेणेकरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी युवा सेना सज्ज असल्याची ग्वाही सुशांत नाईक यांनी दिली.