*कोकण Express*
*नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचा प्रयत्न भाजपा पदाधिकाऱ्यांनी हाणून पाडला*
*कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे प्रसंगावधान*
*त्या कथित केंद्र संचालकांना केले पोलिसांच्या स्वाधीन*
*कणकवली I प्रतिनिधी:*
कणकवली शहरातील भाजपा पदाधिकारी आणि नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी बेरोजगारांच्या होणाऱ्या फसवणुकीचा पर्दाफाश केला. दोन भामट्यांना कणकवली पोलिसांच्या स्वाधीन केले. २५,००० हजार रुपये पगाराची नोकरी देतो असे आमिष दाखवून नोकरी पूर्वी दोन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी ५००० हजार रुपये भरून घेऊन खोटे प्रशिक्षण देऊन पोबारा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भामट्यांची नगराध्यक्ष समीर नलावडे यांना माहिती मिळताच नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्वतः त्या प्रशिक्षण हॉलमध्ये जाऊन त्या भामट्यांवर अनेक प्रश्नांचा भडीमार केला आणि ते त- त, प- प करताच त्या भामट्यांना कणकवली पोलिसांच्या स्वाधीन केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आयुष्यमान भारत योजना अंतर्गत केंद्रसंचालक असल्याचे सांगत दोघांमार्फत कणकवली नगरपंचायत वाचनालय हॉलमध्ये सुरू असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी उपस्थित राहत या कथित केंद्रसंचालकावर अनेक प्रश्नांचा भडीमार केला. तुमच्या निवृत्ती ची ऑर्डर दाखवा तुम्हाला नियुक्ती कोणी दिली ? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७५ तरुण व तरुणींकडून प्रत्येकी ५००० हजार रुपये प्रमाणे जी रक्कम गोळा केली ती घेण्यासंदर्भात शासनाची ऑर्डर दाखवा ? असे एक ना अनेक प्रश्न या कथित केंद्र संचालक संजय पाटील आणि काळे नामक व्यक्तीला विचारत नगराध्यक्ष समीर नलावडे आणि भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी अक्षरशः अनेक प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी उद्धव शिंदे जावेद शेख आदी उपस्थित होते.
तसेच याप्रकरणी कणकवली तालुका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील नगर वाचनालयात बोलवून घेण्यात आले. यावेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी विनोद सावंत, निखिल जाधव, श्री ठाणेकर या ठिकाणी दाखल झाले. अशा प्रकारे आरोग्य विभागाकडून कोणत्याही प्रकारची प्रशिक्षणे आयोजित करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. नंतर या संदर्भात थेट जिल्हा शल्यचिकित्सक यांना यासंदर्भात नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी विचारणा केली त्यावर शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी कोणतीही नियुक्त आम्ही दिली नाही असे स्पष्ट केले.