*कोकण Express*
*कणकवलीतील ७ क्रशरना प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या नोटिसा…!*
*आमदार नितेश राणे यांनी केली होती तक्रार…!*
*कणकवली ः प्रतिनीधी*
कणकवली तालुक्यातील कळसुली व शिवडाव या दोन गावांमध्ये क्रशरमुळे निर्माण होणारा त्रास व प्रदूषण नियमांच्या उल्लंघनाबाबत आमदार नितेश राणे यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार या दोन गावांमधील ७ क्रशरना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आली आहे. सात दिवसात या संदर्भातील कारणे द्या अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल
असा इशारा प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी जे. एस. साळुंखे यांनी दिला आहे.
प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे कळसुली ग्रामस्थ व आमदार नितेश राणे यांची तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनुसार या क्रशर भागाची प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या पथकामार्फत पाहणी करण्यात आली होती. या पाहणी दरम्यान प्रदूषण नियंत्रणाचे योग्य व आवश्यक त्या उपाययोजना केल्या नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. सामुग्री हाताळणी यासह लोडिंग, अनलोडींग यापासून निर्माण होणारी धूळ दाबण्यासाठी कव्हर व आणि पाणी शिंपडण्याची व्यवस्था करण्यात आली नसल्याची बाब देखील या पाहणी दरम्यान
समोर आली होती. तसेच क्रशिंग युनिट च्या बाजूला विंड ब्रेकिंग वॉल लावलेली पाहणी दरम्यान आढळली नाही. यासह अन्य काही महत्त्वपूर्ण त्रुटी काढत या विभागाचे प्रादेशिक अधिकारी जे. एस. साळुंखे यांनी या क्रशर मालकांना नोटीसा बजावल्या आहेत. या संदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आपल्यावर कायदेशीर कारवाई का करण्यात
येऊ नये अशा नोटिसा बजावण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात संबंधित क्रशर मालकांकडून खुलासा आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती क्षेत्र अधिकारी अमित लाठे यांनी दिली.