*कोकण Express*
*जिल्ह्यातील विद्यार्थी सुसंस्कृत व आदर्श नागरिक बनला पाहिजे !*
*भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांचे प्रतिपादन , शैक्षणिक मंडळातर्फे शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ*
कणकवली ः प्रतिनीधी*
प. पू. भालचंद्र महाराज संस्थानाच्या शैक्षणिक मंडळातर्फे गेली ४० वर्षे शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग आणि सराव परीक्षा घेतली जात आहे. ही सराव परीक्षा देणारे विद्यार्थी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत टॉपर असतात. ही बाब अभिमानास्पद आहे. तसेच जिल्ह्यातील विद्यार्थी सुसंस्कृत व आदर्श नागरिक बनला पाहिजे हा शैक्षणिक मंडळाचा उद्देश आहे, असे प्रतिपादन प. पू. भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी केले.
प. पू. भालचंद्र महाराज संस्थानाच्या शैक्षणिक मंडळातर्फे उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरु करण्यात आला. संस्थानाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या शुभारंभा प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी गटशिक्षणाधिकारी किशोर गवस,खजिनदार दादा नार्वेकर,विश्वस्त मुरलीधर नाईक,संस्थानाचे व्यवस्थापक विजय केळसुकर, शैक्षणिक मंडळाचे गजानन उपरकर,विद्यामंदिर प्रशालेचे शिक्षक अच्युत वणवे,शरद हिंदळेकर,रावजी परब विष्णू सुतार मंगेश तेली सदानंदन गावकर, प्रकाश परब,श्रीरंग पारगावकर, आदी मान्यवर तसेच पालक विद्यार्थी उपस्थित होते.
कामत पुढे म्हणाले, विविध क्षेत्रांत करिअर करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना कोणत्या क्षेत्राची आवड आहे, ती ओळखून त्यांना त्या क्षेत्राचे ज्ञान घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
किशोर गवस म्हणाले, आजचे युग हे स्पर्धेचे आहे. या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल विद्यार्थ्यांनी स्वत:ला अपडेट ठेवणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना समोरे गेले पाहिजे. कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर आभ्यासाचे व वेळेचे नियोजन केले पाहिजे. प. पू. भालचंद्र महाराज संस्थानाच्या शैक्षणिक मंडळातर्फे शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग व सराव परीक्षा घेण्याचा उपक्रम स्तुत्य असून या उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घेतला पाहिजे. तसेच शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी यश संपादन करुन आपला गाव, तालुका, जिल्ह्याचे नाव लौकिक करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
गजानन उपरकर म्हणाले, प. पू. भालचंद्र महाराज संस्थानाने १९८२ साली शैक्षणिक मंडळाची स्थापना केली. या मंडळाला ४० वर्षे झाली असून जिल्ह्याचा शैक्षणिक विकासात या मंडळाचे योगदान मोठे आहे. संस्थानाच्या शैक्षणिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग व सराव परीक्षेचा फायदा विद्यार्थ्यांना झाला असून ते विद्यार्थी उच्च पदावर काम करीत आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे. शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत आपणास यश संपादन करायचे आहे, हे ध्येय मनाशी बाळगून ते साध्य करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली पाहिजे. या विद्यार्थ्यांना परीक्षेसंबंधी शिक्षकांकडून मार्गदर्शन दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
विजय केळुसकर यांनी शिक्षण मंडळ स्थापन करण्याचा मागील उद्देश सांगून भविष्यातील व्हिजन त्यांनी उपस्थितांना समोर मांडले. यावेळी अच्युत वणवे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन मार्गदर्शन वर्गात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. आरंभी प. पू. भालचंद्र महाराज व सरस्वती मातेच्या मूर्तीलामान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन प्रकाश परब यांनी केले. तर आभार शरद हिंदळेकर यांनी केले.