*कोकण Express*
*विजेचा शॉक लागल्याने मोर्ले येथील महिला मृत्युमुखी*
*कपडे वाळत घालताना घडली दुर्देवी घटना*
*दोडामार्ग ः प्रतिनिधी*
कपडे वाळत घालताना विजेचा शॉक लागल्याने मोर्ले येथील महिला मृत्युमुखी पडली. ही घटना काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मोर्ले येथे घडली. शुभांगी सुभाष सुतार (वय ५०) असे मृत महिलेचे नाव आहे. अधिक उपचारासाठी दोडामार्ग प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला दाखल करण्यात आले होते. परंतु तत्पूर्वीच तीचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडुन सांगण्यात आले.
शुभांगी सुतार ह्या नेहमी प्रमाणे रात्री घरातील कामे आटपून कपडे वाळत घालत होत्या. मात्र बाजूला असलेल्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने ही दुर्देवी घटना घडली. याबाबत दोडामार्ग पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान शुभांगी सुतार यांची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. मोलमजुरी करुन त्या आपला चरितार्थ चालवत होत्या. मात्र त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.