*कोकण Express*
*जिल्हा बँक चौकुळ शाखा व्यवस्थापक निशिकांत बागडी यांचे अपघाती निधन*
*आंबोली । प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चौकुळ येथील शाखा व्यवस्थापक निशिकांत बागडी (४५) यांचे बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास अपघाती निधन झाले. बागडी आणि त्यांचे सहकारी संतोष शिंदे (४२) हे नेहमीप्रमाणे स्प्लेंडर मोटरसायकलवरून गडहिंग्लज येथून येत असताना आंबोली नांगरतास येथील एका छोट्या वळणावर चुकीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने त्यांना धडक दिली. यावेळी ते सुमारे वीस ते पंचवीस फूट विरुद्ध दिशेने फरपटत गेले. या अपघातात निशिकांत बागडी यांचा जागीच मृत्यू झाला. तर संतोष शिंदे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
याबाबतची खबर आंबोली पोलिसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमी संतोष शिंदे यांना अधिक उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने गडहिंग्लज येथे पाठवले.
तर निशिकांत बागडी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेण्यात आला. बागडी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगीअसा परिवार आहे. दरम्यान या अपघातातील कारचालक प्रकाश कांबळे (रा. सांगली ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल दीपक शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी पाटील व पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत कांबळे करत आहे. निशिकांत बागडे यांच्या मृत्यूमुळे चौकुळ आंबोली परिसरा मधून हळहळ व्यक्त होत आहे. अतिशय मनमिळाऊ व सर्वांची बँकेमध्ये हसतमुख स्वागत करून त्यांची कामे करण्यामध्ये बागडी सारखे सहकार्य कुणाचेच नसल्याचे या ठिकाणी उपस्थित ग्रामस्थ सांगत होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूमुळे खूप मोठे नुकसान झाले असून याबाबत ग्रामस्थांमधून दुःख व्यक्त होत आहे.