*कोकण Express*
*कणकवली फीडरवरून सोनगेवाडीतील नागरिकांना होणार वीज पुरवठा*
*नगराध्यक्ष समीर नलावडे यांची सोनगेवाडी नागरिकांच्या शिष्टमंडळाला ग्वाही*
*कणकवली ः प्रतिनीधी*
कणकवली शहरातील सोनगेवाडी येथे गेली अनेक वर्षे लो होल्टेज व सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारापासून आता सोनगेवाडी वासियांची मुक्तता होणार आहे. कणकवली शहराला ज्या फिडरवरून विद्युत पुरवठा केला जातो त्या फिडरवरूनच सोनगेवाडी करिता विद्युत पुरवठा करण्याकरिता नगरपंचायत निधी देणार आहे. सोनगेवाडी वासियांच्या प्रत्येक समस्यांच्या पाठीशी नगरपंचायत ठाम राहणार आहे. गेली अनेक वर्षे सोनगेवाडी वासियांना भेडसावणारी लो व्होल्टेज व सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होण्याची समस्या दूर होणार आहे. नगरपंचायत निधीतून हे काम हाती घेण्यात येत असून, येत्या दोन दिवसात याचा सर्वे होऊन त्याला तातडीने मंजुरी देणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सोनगेवाडी नागरिकांच्या शिष्टमंडळाला दिली. तसेच सोनगेवाडीतील गार्डन करिता ही विशेष बाब म्हणून निधी देण्यात येणार असून लवकरच हे गार्डनही सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कणकवली शहरातील सोनगेवाडी मध्ये कमी दाबाने वीज पुरवठा व सातत्याने 20 जाण्याच्या प्रकाराबाबत सोनगेवाडीतील ग्रामस्थांनी नगरसेवक विराज भोसले यांच्यासह नगराध्यक्षांची लक्ष वेधले होते त्याची दखल घेत नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी याबाबत तातडीने पावले उचलली. यासंदर्भात आज नगरपंचायत मध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीला नगरसेवक ऍड. विराज भोसले, महावितरण चे सहाय्यक अभियंता सागर कांबळे, नगरपंचायत स्वच्छता निरीक्षण विनोद सावंत, सतीश कांबळे, संदीप उंबळकर, विभव करंदीकर, राजु गवाणकर, लवू पवार, श्री. गावकर, सी आर चव्हाण, सुशील सावंत, शामा तेंडुलकर, एन बी चव्हाण, संतोष तवटे, बाळा पराष्ट्येकर, रुजाय चोडणकर, किसन दुखडें, सर्वेश गावकर, महेश कुडाळकर, आदि उपस्थित होते. सोनगेवाडी करिता आचरा – देवगड फिडर वरून वीज पुरवठा केला जात आहे. हा वीज पुरवठा कणकवली शहराच्या फिडरवरून केला जावा याकरिता अनेक वर्षे पत्रव्यवहार केला. पण महावितरण कडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. डीपीडीसी मध्ये देखील याबाबतचा प्रस्ताव पाठवला. परंतु कणकवली नगरपंचायत च्या प्रस्तावाला डीपीडीसीकडून देखील मंजुरी मिळालेली नाही. या संदर्भात नगरसेवक ऍड.विराज भोसले यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. नागरिकांची गरज व सातत्यपूर्ण मागणीची दखल घेत या कामी नगरपंचायतने पुढाकार घेतल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. यामुळे कणकवली शहरातील ज्यावेळी विद्युत पुरवठा काही कारणाने बंद होईल त्याचवेळी सोनगेवाडीतील विद्युत पुरवठा बंद होईल. इतर वेळी शहरात इतर भागांमध्ये होत असलेला पुरेशा दाबाने विद्युत पुरवठा तसाच सोनगेवाडीमध्ये देखील सुरू राहील असे श्री नलावडे यांनी सांगितले. यावेळी ही महत्त्वपूर्ण व गेली अनेक वर्षांची समस्या मार्गी लावल्याबद्दल सोनगेवाडी ग्रामस्थांनी नगराध्यक्षांचे आभार व्यक्त केले. तसेच सोनगेवाडी उद्यान सुशोभीकरणाची मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीची नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी तातडीने दखल घेत महाराष्ट्र शासनाकडून दोन दिवसापूर्वीच मंजूर झालेल्या अडीच कोटीच्या निधी मधून गार्डन सुशोभीकरणाचे काम घेण्यात येईल. असे आश्वासन यावेळी त्यांनी शिष्टमंडळाला दिले. आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर करून आणला आहे. सोनगेवाडीतील ग्रामस्थांना नवीन सरकारचा पहिलाच निधी खर्च करतो अशी ग्वाही यावेळी नगराध्यक्षांनी दिली. पराष्टेकर घराजवळ पावसाळ्यानंतर रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सोनगेवाडी मधील गार्डन मध्ये काही अनावश्यक वाढलेली झाडे तोडण्याची गरज असल्याची मागणी श्री गावकर यांनी केली. त्याबाबत तातडीने कार्यवाही करा अशा सूचना नगराध्यक्ष श्री नलावडे यांनी दिल्या. सोनगेवाडी करिता कणकवली शहरातून विज पुरवठा करत असताना ट्रान्सफार्मर बसवण्याकरता जागा निश्चित करा अशी सूचना श्री नलावडे यांनी दिली. मात्र सहाय्यक अभियंता सागर कांबळे यांनी ट्रान्सफार्मर बसवण्याची आवश्यकता भासणार नाही असे सांगितले. त्यावर नगराध्यक्ष श्री नलावडे यांनी जे नवीन पोल बसवले जातील त्यात कुणाच्याही जमिनीचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन बसवा अशा सूचना दिल्या. सोनगेवाडी मध्ये गेल्या वर्षी केलेल्या गटाराच्या कामाच्या चेंबरवर झाकण बसवले नसल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यावर नगराध्यक्ष श्री नलावडे यांनी तातडीने हे झाकण बसवा अशा सूचना अभियंता सचिन नेरकर यांना दिल्या. तसेच शेळके हॉस्पिटल च्या जवळ अनेकदा उघड्यावर कचरा टाकला जातो त्यामुळे येथे दुर्गंधीचे वातावरण असते. असा मुद्दा सोनगेवाडी नागरिकांनी मांडला. याबाबत नगराध्यक्ष श्री नलावडे यांनी स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत यांना तातडीने या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा. व उघड्यावर जे कचरा टाकतील त्यांच्यावर कडक दंडात्मक कारवाई झाली पाहिजे या दृष्टीने उद्यापासूनच काम सुरू करा अशा सूचना दिल्या. तर नगरसेवक ऍड. विराज भोसले यांनी स्थानिकांसोबतच नजीकच्या गावांमधील काहीजण या ठिकाणी कचरा आणून टाकतात असा मुद्दा उपस्थित केला. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी कणकवली शहर हे कचराकुंडी मुक्त शहर हे आपण यापूर्वीच केले आहे. मात्र नागरिकांनी देखील नगरपंचायतला सहकार्य करण्याची गरज आहे. जर घंटागाडी येत नसेल तर नगरपंचायतला कल्पना द्या परंतु उघड्यावर कचरा टाकून इतरांना त्रास होत नाही याची प्रत्येकाने काळजी घ्या अशा असे आवाहन केले. मात्र घंटागाडी नियमित येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. पराष्टेकर घराकडील रस्ता खराब झाल्याचा मुद्दा नागरिकांनी उपस्थित केला. त्यावर श्री नलावडे यांनी रस्त्याला गटार असणे गरजेचे आहे. त्यामुळे रस्ता किती जरी दर्जेदार केला तरी गटार नसेल तर पाणी रस्त्यावर येऊन रस्ता खराब होतो. रस्ता रुंदीकरणासाठी सोनगेवाडी नागरिकांनीच पुढाकार घ्या. रस्त्यासाठी आवश्यक असणारा निधी शासनाच्या माध्यमातून आम्ही मिळवून देऊ अशी ग्वाही या नागरिकांना दिली. आचरा रोड हनुमान मंदिर ते कणकवली नगरपंचायत हद्दीपर्यंत पावसाळ्यानंतर नव्याने रस्त्याचे कार्पेट केले जाईल अशी देखील ग्वाही श्री नलावडे यांनी यावेळी दिली. यावेळी काही नागरिकांनी स्वतःहूनच सोनगेवाडीमध्ये स्ट्रीट लाईट सुरळीत सुरू आहे व नळ योजनेचे नळाचे पाणी देखील वेळेवर व पुरेसे येते असे सांगत समाधान व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्ष श्री नलावडे यांनी सोनगेवाडीतील कोणतीही समस्या असली तर हक्काने मला फोन करा. त्या समस्या सोडवल्या जातील. मात्र कुणीही समस्या सोडवण्याच्या नावाने श्रेय घेण्यासाठी खटाटोप करत असेल तर खोट्या अफवांना बळी पडू नका असे आवाहन केले. विकास काम मंजूर करण्यासाठी नगरपंचायत चा ठराव लागतो. आमची मंजुरी लागते. केवळ दिखाऊपणा करून कामे होत नाहीत असा टोला देखील नगराध्यक्ष श्री नलावडे यांनी कुणाचे नाव न घेता लगावला. कणकवली शहरात विकास कामे करत असताना शहराचे भविष्याचे व्हिजन ठेवून कामे केली जात आहेत. शहरात बहुप्रतीक्षित असलेला रिंग रोड देखील काही काळातच अस्तित्वात येणार आहे. या रिंग रोडचे फेज वन चे काम सुरू देखील झाले आहे. अशा वेळी कामे कोण करतो हे जनतेने लक्षात ठेवले पाहिजे असेही श्री नलावडे यांनी सांगितले. तर बंडू हर्णे यांनी कामे मंजूर होतात याची जाग लागल्यावर काहीजण निवेदने देतात व आपणच कामे मंजूर केल्याचा देखावा करतात. हे देखील लोकांनी ओळखले पाहिजे असे श्री हर्णे यांनी सांगितले. काही विरोधी लोकप्रतिनिधींची कामे देखील नगरपंचायतनेच मंजूर केली असे देखील श्री नलावडे यांनी सांगितले. आचरा रोड वरून येणाऱ्या पाण्यासंदर्भात यावेळी मुद्दा उपस्थित करण्यात आला. मात्र आचरा रोडच्या दोन्ही बाजूला असलेल्या गटारांमधून नळ योजनेच्या पाईपलाईन आणलेल्या आहेत. त्यामुळे हे गटार खोदाई केल्यास संपूर्ण पाईपलाईन फुटणार. त्यामुळे ही समस्या सोडवण्यासाठी येत्या काळात काहीतरी निर्णय घेतला जाईल असेही यावेळी सांगण्यात आले. सोनगेवाडीतील रस्ता रुंदीकरणा संदर्भात नागरिकांनी पुढाकार घ्या व रस्ता रुंदीकरणासाठी जागा उपलब्ध करून द्या सोनगेवाडी वासियांसाठी प्रशस्त रस्ता केला जाईल अशी ग्वाही यावेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी दिली. यावेळी सोनेवाडी नागरिकांच्या वतीने नगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.

