*कोकण Express*
*धामापूर येथे डंपरची विद्युत पोलला धडक*
काही काळ वाहतूक ठप्प ; वीजपुरवठा खंडित
*चौके | प्रतिनिधी :*
कुडाळ -मालवण मार्गावर धामापूर येथे मंगळवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास चिरे वहातूक करणाऱ्या डंपर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला.सुदैवाने जीवितहानी टळली.धामापूर ग्रामपंचायत नजीक रस्त्याकडेला असलेल्या ११ के. व्ही. पोलला धडक बसून 11000 व्होल्ट चा पोल उध्वस्त झाला आणि सर्व विद्युत तारा तुटून रस्त्यावर पडल्या. पोलला धडक दिल्यानंतर डंपर रस्त्याकडेला असलेल्या झाडाला अडकून राहिला अन्यथा २० फूट खोल भागात डंपर कोसळून मोठे नुकसान झाले असते. या अपघातात चालकास कोणतीही दुखापत झाली नाही परंतु वीज वितरणचे सुमारे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे वीज कर्मचारी यांनी सांगितले.
सदर डंपर क्रमांक MH 08 H 2200 गोवा येथे चिरे वाहतूक करून चौके येथे परतताना हा अपघात झाला असून डंपरच्या केबिन चे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती आणि गावातील विद्युत पुरवठा खंडीत झाला. यावेळी वीज वितरण चे कर्मचारी सागर गावठे , योगेश काळसेकर , आबा परब यांनी तातडीने घटनास्थळी येत वीजपुरवठा खंडीत करून स्थानिक आणि वाहनचालकांच्या मदतीने रस्त्यावरील विद्युत पोल बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आणि विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेतले.