*कोकण Express*
*तळेरे येथील मेडिकल व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला प्रकरणी दोघांना अटक*
तळेरे येथील मेडिकल व्यावसायिक जगदिश सदाशिव डंबे (५४) रा. कासार्डे : जांभळवाडी यांना लुटण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या तीन आरोपींपैकी दोन आरोपींना कणकवली पोलिसांनी कोल्हापूर कारागृहातून ताब्यात घेतले. रोहित भरत मोरे (२१) करवीर कोल्हापूर व शुभम जयसिंग सातपुते (२३) सुर्यवंशी कॉलनी कोल्हापूर अशी त्यांची नावं आहेत. येथील न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपीही कोल्हापूर येथील कारागृहात असून काही तांत्रिक कारणामुळे त्याला ताब्यात घेता आले नाही परंतु लवकरच त्याला अटक करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे यांनी सांगितले.
या प्रकरणातील आरोपींनी लुटून नेलेला मोबाईल कोल्हापूर पोलिसांनी यापूर्वीच हस्तगत केला असून आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे सागर खंडागळे यांनी सांगितले.
अशाच मोबाईल व मोटरसायकल चोरी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. कोल्हापूर परिसरातील आठ चोरीचे गुन्हे या आरोपीच्या विरोधात कोल्हापूर पोलिसात दाखल झाले आहे. कोल्हापूर येथील गुन्ह्यांप्रकरणी पोलिस कोठडीनंतर आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी ताब्यात घेतले सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे, पोलिस कॉ. रूपेश गुरव, मनोज गुरव, चालक मकरंद माने यांनी आरोपींना कारागृहातून ताब्यात घेतले.
मेडिकल व्यावसायिक जगदिश सदाशिव डंबे ‘मॉर्निंग वॉक’ ला गेले असता मुंबई : गोवा महामार्गावर त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना ९ जुन रोजी पहाटे ५ वा.च्या सुमारास घडली होती. तिघे आरोपी दुचाकीने गेले होते. मालवणला जाण्याचा रस्ता विचारण्याचा बहाणा करून त्यांनी डंबे यांच्याजवळ गेले. मोटरसायकलवरून उतरलेल्या दोघांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. परंतु डंबे मॉर्निंग वॉक ला गेल्याने त्यांच्याकडे पैसे नाहीत समजल्यावर त्यांच्या हातातील अंगठी काढून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी डंबे यांच्या नाकावर ठोसा मारला. चाकु खुपसण्याचा प्रयत्न केला. परंतु डंबे यांच्या प्रतिकारामुळे त्यांना चाकुचा वार करता आला नाही त्यावेळी डंबे यांनी मदतीसाठी आरडाओरड केल्यावर काहीजण मदतीला धावल्यावर आरोपीने डंबे यांचा ३२ हजार रू. किंमतीचा मोबाईल घेऊन दुचाकीने पसार झाले होते.