देवगड ‘टीचर टॉक फोरम’ची घोषणा

देवगड ‘टीचर टॉक फोरम’ची घोषणा

*कोकण Express*

*देवगड ‘टीचर टॉक फोरम’ची घोषणा*

*अध्यक्षपदी विवेक कुलकर्णी यांची निवड*

देवगड ः प्रतिनिधी*

एस. आर. दळवी फाऊंडेशनच्या ‘टीचर टॉक फोरम’ ची देवगड तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी विवेक गोविंद कुलकर्णी, सचिवपदी दामोदर शंकरराव चौधरी तर उपाध्यक्षपदी चंद्रमनी रामचंद्र तांबे आणि रश्मीगंधा रमेश मालंडकर तसेच सहसचिवपदी मंगेश रमाकांत हिर्लेकर यांची निवड करण्यात आली आहे. एस. आर. दळवी फाउंडेशनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष महेश सावंत यांनी ही कार्यकारणी जाहिर केली आहे.

विलवडे गावचे सुपुत्र रामचंद्र धर्माजी दळवी आणि सिता दळवी यांनी मुंबईत राज्यस्तरीय एस. आर. दळवी फाऊंडेशनची स्थापना केली आहे. शिक्षक सक्षमीकरण हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतचे सर्व शिक्षक या संस्थेच्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात. ही संस्था शिक्षक संघटना नसून शिक्षकांना शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन संधी उपलब्ध व्हाव्यात, शिक्षकांमधील सुप्त कलागुणांचे प्रकटीकरण होण्यासाठी विविध स्पर्धा तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे विविध उपक्रम राबविणारी आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करणारी संस्था आहे. एस. आर. दळवी फाऊंडेशनच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत व उपक्रमशील शिक्षकांचा शोध घेऊन त्यांच्या शैक्षणिक कार्याचा जगभर प्रचार आणि प्रसार करण्यात येणार आहे. तसेच शिक्षक विद्यार्थ्यांचे पर्यायाने देशाचे भविष्य घडवित असताना आणखी काय करता येईल, यासाठीच एस. आर. फाउंडेशनने ‘टीचर टॉक’ ॲप हे व्यासपीठ शिक्षकांसाठी निर्माण केले. या ऍपच्या माध्यमातून शिक्षक एकाच व्यासपीठावर येणार असून विचारांची देवाण घेवाण होणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी यात सहभागी होऊन आपल्या कल्पना, संकल्पना व सुचना या ऍपवर मांडायच्या आहेत.

‘टीचर टॉक फोरमची’ स्थापना ही केवळ शिक्षकांचा विकास व त्यांना सन्मान मिळावा या उद्देशाने झालेली आहे. या ॲपच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील अनुभवी शिक्षकांच्या ज्ञानाचा फायदा होणार आहे. तसेच शैक्षणिक बातम्या आपणास ‘टीचर टॉक’ ॲपमध्ये पाहावयास मिळणार आहेत. तसेच राज्यभरातील इतर शिक्षकांशी संवाद साधता येणार असून आपले उपक्रम त्यांच्यापर्यंत पोहचण्याची सुवर्णसंधी सर्वांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी सदर ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेश सावंत यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!