*कोकण Express*
*तळेरेत बळीराजाच्या सन्मानार्थ जि. प. आदर्श प्राथ. शाळा नं १ चे विद्यार्थी पोहोचले स्थानिक शेत – बांधावर*
*’एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रम अर्थात ‘बांधावरची शाळा’ उपक्रम उत्साहात संपन्न*
*कासार्डे:संजय भोसले*
जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं १ या शाळेच्या वतीने ‘एक दिवस बळीराजासाठी’ हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी थेट स्थानिक शेतकऱ्यांच्या शेत-बांधावर जाऊन शेतीविषयक विविध प्रकारचे ज्ञान व माहिती प्रत्यक्ष स्वानुभवातून प्राप्त करून घेणे, शेतकऱ्यांच्या विविध अडी-अडचणी जाणून घेऊन शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ प्रत्यक्ष शेतीच्या कामात भाग घेणे, तसेच शेतकऱ्यांविषयी ऋण भावना व्यक्त करून शेतकऱ्यांचे थोडे – फार मनोरंजन देखील करणे अशा विविध हेतूने सदरचा उपक्रम राबविण्यात आलेला असून त्याकरीता स्थानिक शेतकरी असलेले संतोष विश्राम नारकर व अनंत विश्राम नारकर या बंधूंनी विशेष सहकार्य केले.
या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांच्या सह माजी पं. स. सभापती दिलीप तळेकर, माजी सरपंच चंद्रकांत तळेकर, माजी सरपंच शशांक तळेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश जाधव, उपाध्यक्षा सौ. सिद्धी साटम, सरपंच सौ. साक्षी सुर्वे, उपसरपंच दिनेश मुद्रस, ग्रामस्थ सौ. देवकी तळेकर, शैलेश सुर्वे, केंद्रप्रमुख गोपाळ जाधव, मुख्याध्यापिका सौ. पद्मजा करंदीकर, सहा. शिक्षिका सौ. बेळणेकर, सहा. शिक्षिका सौ. कदम, सहा. शिक्षिका सौ. चव्हाण, सहा. शिक्षक सत्यवान चव्हाण व सहा. शिक्षक श्रीराम विभूते हे विद्यार्थी उपस्थित होते.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश जाधव यांनी ‘एक दिवस बळीराजासाठी’ या उपक्रमाविषयी शालेय विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सहा. शिक्षक श्रीराम विभूते व सहा. शिक्षक सत्यवान चव्हाण यांनी यांत्रिक साधन – सामग्रीचा वापर शेतीकरीता कसा करण्यात येतो याची प्रात्यक्षिकाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना माहिती दिली. स्थानिक शेतकरी संतोष नारकर यांनी देखील शालेय विद्यार्थ्यांच्या शेतीविषयक प्रश्नांना योग्य अशी उत्तरे दिली. यानंतर उपस्थित सर्वांनीच शेतकऱ्यांच्या समवेत तरवा काढणे, लावणी करणे, खत फवारणी इ. शेती विषयक कामकाजाचा प्रत्यक्ष सहभाग घेतला. तसेच उपक्रमाच्या अंततः शेतकऱ्यांच्या सह उपस्थित सर्वांनीच उपहार – न्याहारीचा आनंद घेत शेतकऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.