*कोकण Express*
*परफेक्ट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची वसुंधरा विज्ञान केंद्राला भेट*
जेईई आणि नीट या परीक्षांसाठी संपूर्ण कोकण आणि गोवा येथील अव्वल मानली जाणारी परफेक्ट अकॅडमी, कुडाळ ही नेहमीच आपल्या नवनवीन शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांसाठी चर्चेमध्ये असते. आज शनिवार दिनांक 9 जुलै रोजी कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील वसुंधरा विज्ञान केंद्राला भेट दिली.
परफेक्ट अकॅडमी चे सर्वेसर्वा प्राध्यापक राजाराम परब यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले ” जेईई, नीट या परीक्षांमध्ये भारताभरातून विद्यार्थी बसत असल्यामुळे या परीक्षेमधील कडव्या स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना अकरावी बारावी ही दोन वर्ष प्रचंड मेहनत घ्यावी लागते. पण या परीक्षांची तयारी करत असताना विज्ञानातील ज्या गोष्टी आपण शिकतो त्या गोष्टींचे देखावे, त्यांची माहिती, विज्ञान समजावून सांगणारे काही प्रयोग हे विद्यार्थ्यांना स्वतः पाहता यावे आणि त्यातून त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान याची सांगड पुढे जाऊन घालता यावी, हा या मागचा उद्देश होता “.
परफेक्ट अकॅडमीच्या इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी या वसुंधरा विज्ञान केंद्र भेटीमध्ये उत्साहाने सहभाग घेतला, तसेच परफेक्ट अकॅडमीच्या आणि वसुंधरा विज्ञान केंद्रातील शिक्षकांकडून त्यांना नवनवीन गोष्टी त्या ठिकाणी शिकता आल्या. सदर उपक्रमावेळी विद्यार्थ्यांसोबत हेमंत मेहता, सायली बोडके, अमित कुमार आणि अमरेंद्र मोहंतो तसेच परफेक्ट अकॅडमी चे इतर कर्मचारी सहभागी होते.
वसुंधरा विज्ञान केंद्र करत असलेल्या या विज्ञानाच्या चळवळीत आपण शक्य होईल तेवढे नक्की योगदान देऊ असे आश्वासन परफेक्ट अकॅडमी कडून यावेळी देण्यात आले.