*कोकण Express*
*छत्रपती शिवाजी महाराज यांचा जुना पुतळा नगरपंचायत प्रशासनाने केला स्थलांतरित*
*छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सुरक्षीत ठेवला होता नगरपंचायतमध्ये*
*शनिवारी मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात प्रशासकीय केली कारवाई*
*कणकवली : संजना हळदिवे*
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नगरपंचायत प्रशासनाने पुढाकार घेत पोलीस बंदोबस्तात मध्यरात्री २ वाजल्यानंतर स्थलांतरित करण्यात आला. तो पुतळा कणकवली नगरपंचायत मध्ये सुरक्षित ठेवण्यात आला आहे.
सर्व्हिस रस्त्यावर असलेल्या या पुतळ्याचे स्थलांतर करण्यात आले आहे.
पुतळ्याचे स्थलांतर करण्याच्यादृष्टीने नगरपंचायत मुख्याधिकारी अवधूत तावडे व प्रशासनाने तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रव्यवहार केला होता. सर्व्हिस रोडवर छत्रपतींचा पुतळा स्थलांतर व्हायला हवा, त्यासाठी परवानगी मागितली होती. त्यानुसार सर्व्हीस रोड वरील पुतळा हटविण्याकरता पुरेसा कामगार वर्ग व जेसीबी, ट्रॅक्टर यंत्रणा सज्ज करत रातोरात हा पुतळा स्थलांतर करण्यासाठी नगरपंचायत मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात करण्यात आला आहे. गेली तीन वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतर मुद्द्यांवर वाद झाले होते. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी एक जागा सुचवली तर संदेश पारकर यांनी स्मारक स्वरूपात पुतळा स्थलांतर करावा, अशी मागणी केली होती. शिवसेना व भाजपा अश्या दोन भूमिका या पुतळ्याच्या स्थलांतर मुद्यांवर होत्या. त्यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी नगरपंचायत मध्ये सर्वपक्षीय बैठकही आयोजित केली होती.
माजी पालकमंत्र्यांनी आश्वासने दिली मात्र त्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. मात्र त्यानंतर नुकताच छत्रपती शिवाजी महाराज चौकात नव्याने पुतळा स्थापन केल्यानंतर या जुन्या पुतळ्याच्या स्थलांतरणाचे काय? हा प्रश्न निर्माण झाला होता. आ. नितेश राणे यांनीही या पुतळ्याचे स्थलांतर तातडीने करावे, अन्यथा गनिमीकावा काय असेल ते दिसेल, असा सूचक इशारा प्रशासनाला दिला होता. सकल मराठा समाज व सुदर्शन मित्रमंडळ यांनीही पुतळा स्थलांतर व्हावा, यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला यानिमित्ताने यश आले आहे असेच म्हणावे लागेल. सर्व्हिस रस्त्यावरील पुतळा स्थलांतर झाल्याने रस्ता वाहतुकीस मोकळा झाला आहे. तर नवा पुतळा उभारणीमुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळाही कायम राहिल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.