*कोकण Express*
*बांदा येथे एन डी आर एफ चे पथक दाखल ; तेरेखोल नदिपात्राची केली पाहणी…*
*बांदा: प्रतिनीधी*
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन स्थितीत बचावकार्य करण्यासाठी बांदा शहरात आज दुपारी एनडीआरएफचे पथक दाखल झाले. बांदा शहरातील पूरप्रवण क्षेत्र, बाजारपेठ तसेच तेरेखोल नदीपात्राची पाहणी या पाथकाने केली.
यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील, पोलीस निरीक्षक शामराव काळे, सरपंच अक्रम खान, उपनिरीक्षक समीर भोसले, महसूल मंडळ अधिकारी आर वाय राणे, तलाठी वर्षा नाडकर्णी, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, बाळू सावंत, राजेश विरनोडकर, साई काणेकर, शामसुंदर मांजरेकर, अन्वर खान, प्रथमेश गोवेकर, सुनील धामापूरकर, उमेश सावंत आदी उपस्थित होते. एनडीआरएफच्या पथकाचे निरीक्षक पुरुषोत्तम राणा सिंग यांनी येथील पुरस्थितीची माहिती घेतली.
सरपंच अक्रम खान यांनी बांदा शहरात हे पुरबाधित असून प्रशासनाने एनडीआरएफचे पथक पाठविल्याने आभार व्यक्त केले.
. तेरेखोल नदीची पाणी पातळी जाहिर करावी
. जिल्हा प्रशासनाकडून मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नदी किनाऱ्यालगतच्या लोकांना अलर्ट करण्यासाठी दररोज सायंकाळी प्रमुख नद्यांची पाणी पातळी, इशारा पातळी व धोका पातळी जाहिर करण्यात येते. मात्र तेरेखोल ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून व पावसाळ्यात पुराच्या पाण्याने सर्वाधिक नुकसान होत असल्याने प्रशासनाने या नदीची देखील पाणी पातळी दररोज जाहिर करावी अशी मागणी यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत व जावेद खतीब यांनी केली. यामुळे पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांना सतर्क राहण्यासाठी मदत होईल. तहसीलदार श्रीधर पाटील यांनी तात्काळ याबाबत अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.