*कोकण Express*
*फोंडाघाट महाविद्यालयात कृषी दिन साजरा*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
भारत हा कृषिप्रधान देश आहे. या देशाचा शेतकरी जगला पाहिजे. शेतकरीच निसर्ग निर्माण करतो. त्याचे संवर्धन करतो. याच निसर्गात माणसाचे जीवन समृद्ध होते. औद्योगीकरणात निसर्गाची झालेली आणि भविष्यात होणारी हानी यामुळे मानवाच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे. त्यात निसर्ग वाचला तरच मानव वाचणार आहे. त्यामुळे निसर्ग वाचवणे हे आपल्या तरुणांची जबाबदारी आहे. असे प्रतिपादन फोंडाघाटच्या कृषी सहाय्यक अक्षया परब यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागामार्फत महाराष्ट्र कृषी दिन आयोजित करण्यात आला होता. त्याच्या प्रास्ताविकात डॉ. सुरवसे म्हणाले की शेतीला व्यावसायिक रूप देणे गरजेचे आहे. शेतीतील उत्पन्न वाढले तरच शेतकरी वाचेल. असे मत व्यक्त केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती माननीय श्री. संदेश पाटेल म्हणाले की निसर्गाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुक्त हस्ते काही खूप दिलेले आहे. शहरातील रूक्ष वातावरणात राहण्यापेक्षा निसर्ग संपन्न कोकणात रहा.
तात्काळ उत्पन्न देणारी कृषी निर्मिती निर्माण झाली पाहिजे. शेतीतून मिळणारे उत्पन्न चांगले असते. निसर्ग वाचवा म्हणजे निसर्ग तुम्हाला मुक्त हस्ते मोफत परतावा देतो.आपण आपले गट निर्माण करून उद्योगात भरारी घेऊ शकतो. महाविद्यालयीन शिक्षणाबरोबर शेतीचा अभ्यास करून शेती केली पाहिजे. शेतीचे माध्यम सर्वांगीण विकास साधणारे असते. आपला विकास निसर्गाची कास धरून करा. असे मत व्यक्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू फुलझेले म्हणाले की कृषी चळवळ महत्त्वाचीआहे. कृषी उत्पन्नावरच आपल्या देशाचे अर्थकारण चालते. कृषीक्षेत्रामधूनच आपल्याला ऑक्सिजन मोफत मिळतो. निसर्ग आपल्याला एका वर्षात साडेपाच लाख रुपयाचा ऑक्सिजन मोफत देतो. कोणत्याही उत्पादनाचे मूळ घटक निसर्गातूनच मिळतात. त्यामुळे निसर्गावरच आपण अवलंबून आहोत.असे मत व्यक्त केले.
महाविद्यालयाच्या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. बालाजी सुरवसे यांनी केले तर आभार प्रा. संतोष आखाडे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.