*कोकण Express*
*सावरवाड येथे पेट्रोल डिझेलने भरलेला टँकर जळून खाक ; सुदैवाने चालक बचावला*
*मालवण ः प्रतिनिधी*
मालवण चौके येथील भगवती पेट्रोलियम या पेट्रोल पंपावर डिझेल व पेट्रोल घेऊन येणाऱ्या भगवती पेट्रोलिअम पंपाच्या मालकीच्या टँकरचा शुक्रवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास सावरवाड येथे अपघात झाला. यामध्ये चालकाच्या पायाला दुखापत झाली. सुदैवाने जीवीतहानी टळली. मात्र टँकरचे मोठे नुकसान झाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे, की चौके येथील भगवती पेट्रोलिअमचा टँकर MH07-P-1212 हा नेहमीप्रमाणे सांगलीहून चौके येथे पेट्रोल आणि डिझेल घेऊन येताना मालवण सावरवाड गणेश मंदिर येथे आला असता अपघात झाल्याने रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. यावेळी टँकरमध्ये 6000 लीटर पेट्रोल तर 6000 लीटर डिझेल होते, अशी प्राथमिक माहिती मिळते. अपघातानंतर शॉर्ट सर्कीट झाल्याने आगीचा भडका उडाला व संपूर्ण टँकरने पेट घेतला. सुदैवाने चालक स्फोट होण्यापूर्वी बाहेर पडल्याने तो बचावला. परंतु चालकाच्या पायाला दुखापत झाली. तर टँकरचे मोठे नुकसान झाले असून टँकर जळून खाक झाला. यामुळे चौके येथील पंपावर पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण होणार आहे.