*कोकण Express*
*ॲट्रॉसिटी, विनयभंग प्रकरणी निर्दोष मुक्तता*
*कणकवली ः प्रतिनिधी*
अनुसूचित जातीची महिला घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन तिचा विनयभंग केल्याच्या आरोपातून कसवण येथील प्रभाकर राजाराम पालव याची अतिरिक्त जिल्हा सत्र तथा विशेष न्यायाधीश श्रीमती एस. एस. जोशी यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
फिर्यादीचे आई- वडील बाहेरगावी गेल्याची संधी साधत फिर्यादी कुटुंबाला दिलेल्या लाकडाचे पैसे मागण्याच्या बहाण्याने ती अनुसूचित जातीची आहे, हे माहीत असतानाही घरात अनाधिकारे प्रवेश करून तिचा विनयभंग केल्याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिसांत आरोपीविरुद्ध भादंवि कलम ४५२, ३५४, ३५४ (अ) १ (एक) आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ (१) (डब्ल्यू). (आय) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण चिंचळकर यांनी केला होता.
सदरचा खटला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात चालला असता फिर्यादीतर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती, तक्रारीस झालेल्या विलंबाबाबत सबळ कारण पुढे न येणे, फिर्यादी व आरोपी यांच्यातील व्यवहार तसेच गावातील राजकीय वैमनस्य आणि त्यामुळे तालुकास्तरीय पदावरील व्यक्तींच्या प्रोत्साहनामुळे आरोपीविरुद्ध दिलेली फिर्याद, तपासातील त्रुटी आदी कारणांमुळे न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.