*कोकण Express*
*कारला धडक देऊन जखमी केल्याप्रकरणी टँकरचालक निर्दोष*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू असताना परिवर्तीत मार्गाचा अंदाज न आल्याने सीमेंट टँकर चालकाने वॅगनआरला धडकून न थांबता पळून जाण्याचा प्रयत्न केला. तसेच दोन्ही वाहनांच्या नुकसानीला व फिर्यादी विराट अशोक राणे (रा. तळेरे) यांच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याच्या आरोपातून सीमेंट टँकरचालक अशोक पांडुरंग लोहार (रा. सोलापूर) याची येथील सहप्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. बी. सोनटक्के यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे अँड. उमेश सावंत, कणकवली यांनी काम पाहिले.
दि. २६ मे २०१८ रोजी हुंबरट – पिंपळवाडी येथील महामार्गाचे काम सुरू असताना पहाटे १.३० वा. च्या सुमारास फिर्यादी वॅगनआर चालक विराट राणे हे हुंबरटच्या पुढे आले असता समोरून सीमेंट टँकर रस्त्याच्या दुभाजकास ठोकर मारून वॅगनआर कारला समोरून जोरात धडकला. त्यानंतर टँकर न थांबता फोंड्याच्या दिशेने निघून गेला. वॅगनआर चालकाला रात्रीच्या पोलीस गस्तीच्या वाहनाने दावाखान्यात दाखल केले. तसेच फोंडाघाट चेकपोस्ट येथे कळविले असता सीमेंट टँकर ताब्यात घेण्यात आला व चालक अशोक लोहार याच्याविरूद्ध भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४, १८७ अन्वये गुन्हा दाखल करून दोषारोप ठेवण्यात आला होता. सुनावणीत एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती, घटनास्थळ पंचनामा सिद्ध न होणे यामुळे आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

