*कोकण Express*
*अखेर मल्हार पूल वाहतुकीस खुला*
*नाटळ नदीवरील मल्हार पुलाचे उदघाटन माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, संजना सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत*
*कणकवली ः प्रतिनिधी*
नाटळ नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या मल्हार पुलाचे उदघाटन माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, संजना सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक जेष्ठ नागरिक विठ्ठल रासम, अण्णा गोवेकर यांच्या हस्ते आज सकाळी श्रीफळ वाढवून करण्यात आले. पावसाळा सुरू झाला असून वाहतुक योग्य तयार झालेल्या मल्हार पुलाचे उदघाटन 19 जून रोजी करावे, अशी मागणी माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिष्टमंडळाने पिडब्ल्यूडी उपअभियंता कर्वे यांच्याकडे केली होती. सदर पुलाला 4 कोटीहून अधिक निधी मंजूर झाला. मात्र प्रत्यक्षात पूल बांधून ठेकेदाराने पूर्ण केला तरीही केवळ 33 लाख निधीची तरतूद करण्यात आली हे वास्तव आहे. आवश्यक निधी नसतानाही ठेकेदार मुद्स्सरनझर शिरगावकर यांनी खिशातील निधी खर्चून जनतेची अडचण दूर व्हावी या उद्देशाने संपूर्ण पुलाचे बांधकाम केले आहे. याबद्दल ठेकेदार शिरगावकर यांचे सहकारी दीपक दळवी यांचे जाहीर अभिनंदन पूल उदघाटन प्रसंगी भाजपच्या वतीने करण्यात आले.
गतवर्षी नाटळ नदीवरील कोसळलेला मल्हार पूल नव्याने बांधण्यात आला खरा मात्र पावसाळा सुरू होऊनही उदघाटन न झाल्याने वाहनांची वाहतूक मात्र नदीपात्रातील लोखंडी साकवावरून सुरू होती. मात्र एसटी, ट्रक, टेम्पो आदी अवजड वाहने नदीपात्रातून पावसात नेणे अशक्य होते. पाऊस वाढला आणि नदीपात्रात पाणी वाढले की वाहतूक पुन्हा ठप्प होणार होती. यासाठी शासकीय उदघाटनाची वाट न पाहता 19 जून रोजी मल्हार पूल वाहतुकीस खुला करण्याची मागणी संदेश सावंत यांनी पिडब्ल्यूडी अधिकाऱ्यांकडे केली होती. दरम्यान 22 जून रोजी सदर पुलाचे शासकीय उदघाटन केले जाणार होते. मात्र तत्पूर्वीच आज 19 जुन रोजी मल्हार पूल जनतेसाठी वाहतुकीस खुला करून संदेश सावंत यांनी जनतेची गैरसोय दूर करतानाच शिवसेनेवर मात्र कडी केली आहे.