*कोकण Express*
*एसटीचे विभागनियंत्रक प्रकाश रसाळ निवेदन देताना शिवसेना नेते संदेश पारकर. सोबत कंत्राटी चालक*
*…त्या कंत्राटी चालकांना सेवेत मुदतवाढ द्या*
*शिवसेना नेते संदेश पारकर यांची एसटी विभाग नियंत्रकांकडे मागणी*
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी शासनातर्फे नाशिक येथील अस्तित्व मल्टिपर्पज प्रा. लि. एजन्सीच्या माध्यमातून कंत्राटी चालकांची नियुक्ती केली गेली. या चालकांच्या सेवेची मुदत १५ जूनला संपली आहे. परिणामी संपकाळात जीवावर उदार होऊन काम करणारे हे कर्मचारी आता बेरोजगार होणार असल्याने त्यांच्या सेवेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी कोकण पर्यटन विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा शिवसेना नेते संदेश पारकर यांनी एसटी विभागनियंत्रक प्रकाश रसाळ यांच्याकडे केली. त्यानुसार श्री. रसाळ यांनीही या चालकांना २७ जूलैपर्यंत मुदतवाढ देत असून या त्यांच्या अन्य मागण्याही शासनस्तरावर पोहोचविणार असल्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी सदरचे कंत्राटी चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एसटी संपकाळात अस्तित्व एजन्सीच्या माध्यमातून ७७ चालकांना नियुक्ती देण्यात आली असून त्यातील २२ चालक सध्या कार्यरत आहेत. मात्र, त्यांच्या सेवेची मुदत संपली असून मुदतवाढ देण्याबाबत संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने या चालकांनी श्री. पारकर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रसाळ यांची भेट घेतली. संपकाळात एसटीच्या कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांचा रोष पत्करून हे चालक सेवा बजावत होते. मात्र, जसजसे नियमीत एसटी कर्मचारी सेवेत रुजू होऊ लागले, तसे या कंत्राटी चालकांचा एसटी प्रशासनाला विसर पडू लागला आहे, असे पारकर यांनी रसाळ यांच्या निदर्शनास आणले.
या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे श. सध्या त्यांना २६ दिवसांचे १४ हजार ५०० रुपये वेतन मिळत आहे, त्यामध्ये वाढ व्हावी . तसेच ‘ओव्हरड्युटी’ झाल्यास त्याचे वेगळे वेतन मिळावे, अशी मागणीही पारकर यांनी केली. कंत्राटी चालक दुरच्या ठिकाण एसटी एसटी नेतात, तेथून ड्युटी संपवून परत येताना त्यांनाही एसटी तिकिट काढावे लागते, हे अन्यायकारक आहे. त्यासाठी या कर्मचाऱ्यांना पाससेवा द्यावी. या कर्मचाऱ्यांना बऱ्याचदा त्यांच्या राहत्या ठिकाणापासून दुरची ड्युटी दिली जाते. तसे न करता त्यांना सोयीची ड्युटी मिळावी, अशी मागणीही पारकर यांनी केली.
वास्तविक संपकाळापूर्वीपासूनच असलेल्या एकूण रिक्त पदांची संख्या लक्षात घेऊन हे कंत्राटी चालक नियुक्त करण्यात आले होते. साहजिकच संपातील कर्मचारी सेवेत रुजू झाले, तरी कंत्राटी चालकांचा सेवाकाळ थांबविण्याची गरज नाही, असेही पारकर यांनी निदर्शनास आणले. एसटी विभागाला गरज होती, त्यावेळी या कंत्राटी चालकांनी सेवा बजावली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होता कामा नये, असेही पारकर म्हणाले . तर या कर्मचाऱ्यांच्या मागण्या वरिष्ठ स्तरापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन रसाळ यांनी दिले.