*कोकण Express*
*मोबदला मिळाला नसल्याने घाडीगांवकर कुटुंबीयांनी दिलीप बिल्डकॉनने अतिक्रमण केलेल्या जागेतील काम पाडले बंद..*
*मोबदला मिळत नाही, तोपर्यंत हटणार नाही; घाडीगांवकर कुटुंबियांची भूमिका*
*कणकवली ः प्रतिनिधी*
वागदे उभा देव देवस्थानासमोर सखाराम व शिवराम बाबाजी घाडीगांवकर यांची महामार्ग चौपदरीकरणासाठी १८ गुंठे जमीन जाऊनही, त्याचा अद्याप मोबदला मिळाला नसल्याने घाडीगांवकर कुटुंबियांनी आक्रमक भूमिका घेत. दिलीप बिल्डकॉनने अतिक्रमण केलेल्या जागेतील काम बंद पाडले. जोपर्यंत मोबदला मिळत नाही, तोपर्यंत येथून हटणार नाही, अशी भूमिका घाडीगांवकर कुटुंबीयांनी घेतली. याबाबत प्रांताधिकारी यांची भेट घेण्यात आली. मात्र, त्यांच्याकडुनही मोबदला देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने, मोबदला नाही तोपर्यंत काम नाही. हा पवित्रा घाडीगांवकर कुटुंबीयांनी कायम ठेवला.
दिलीप बिल्डकॉन ठेकेदार कंपनीने अनधिकृतपणे घाडीगांवकर कुटुंबीयांच्या जमिनीत अतिक्रमण केल्याचा आरोप महादेव घाडीगावकर यांनी केला. महामार्ग चौपदरीकरणासाठी घाडीगांवकर कुटुंबीयांच्या खाजगी जागेतील झाडे तोडून तिथे मातीचा भराव टाकण्यात आला. त्यामुळे घाडीगांवकर कुटुंबीयांनी आपल्या जमिनीत फलक लावुन, काम सुरू केलेल्या ठिकाणीच ठिय्या मांडला. आमच्या मालकीच्या जमिनीत अतिक्रमण करत, रात्री-अपरात्री येत मातीचा भराव टाकून ठेकेदार कंपनी मनमानी करत असल्याचा आरोप घडीगावकर कुटुंबियांकडून करण्यात आला.
अतिक्रमण करून पुन्हा काम चालू केल्यास कोणताही अनुचित प्रकार घडला, तर त्याला प्रशासन व ठेकेदार कंपनी जबाबदार राहील. असा इशाराही घाडीगांवकर कुटुंबियांनी दिला आहे.
दरम्यान सोमवारी प्रांताधिकारी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनीही जोपर्यंत मोबदला मिळत नाही, तोपर्यंत तुमच्या जमिनीत काम करायला देऊ नका. असे सांगितल्याचे घाडीगांवकर यांनी सांगितले. तसेच तुमचा निवडा मी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवते, असे घाडीगांवकर यांनी सांगितले.
ठेकेदार कंपनी जमीन मालकांची दिशाभुल करून काम उरकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप घाडीगांवकर यांनी केला.
दिलीप बिल्डकॉन ठेकेदार कंपनी सखाराम घाडीगांवकर व शिवराम घाडीगांवकर यांच्या खाजगी जागेत अनधिकृतपणे अतिक्रमण करून काम करत असताना, त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी आमच्याशी अतिरेकी भूमिका घेतल्याचा आरोप घाडीगांवकर यांनी केला. मात्र, ठेकेदार कंपनीच्या अरेरावीला घाबरून कोणत्याही परिस्थितीतून हटणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला.
यावेळी त्यांच्या सोबत महादेव घाडीगांवकर, दादा घाडीगांवकर, ग्रामपंचायत सदस्य रुपेश आमडोसकर, तंटामुक्ती अध्यक्ष, आदि उपस्थित होते. सरपंच पुजा घाडीगांवकर, उमेश घाडीगांवकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.