संगीत नाटकाची नांदी

संगीत नाटकाची नांदी

*कोकण Express*

*संगीत नाटकाची नांदी !*

*कासार्डे:संजय भोसले*

मराठी माणसाचं पहिलं प्रेम संगीत नाटक! वसंतरावांच्या मुलाखतीत व.पु.म्हणाले ते अगदी खरं आहे.नाटक सुरू झाल्यावर प्रेयसीची जरी हाक आली तरी जाणार नाही तो मराठी माणूस.
फूटलाईट्सच्या प्रकाशात हुळहुळणारा मखमली पडदा पहात प्रतिक्षा करणं हे त्याच्या प्रतिक्षेच सार्थकच!नांदी सुरू झाल्यावर वधुवराना अंतरपाट असह्य व्हावा तसाच तो पडदा असह्य होतो अशी रसिकांची अवस्था असते!
व्यावसायिक संघांचे दौरे आर्थिक व्यवहार्यतेपोटी कमी झाले वा थांबले आणि शहरांबाहेरच्या मराठी माणसाची संगीत नाटकासंदर्भात सांस्कृतिक उपासमार झाली आणि होतेही आहे.कोरोना काळात आवश्यक गरजांचा निकष लावत नाट्यगृह फक्त इमारती झाल्या आणि नटराजाचा हुंदका रंगपटातच गुदमरला.
बदलल्या काळानुसार काही अनुकूल गोष्टीही घडल्या.हौशी कलावंत आणि तंत्रज्ञानामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन आला. अचूकपणा, वक्तशीरपणा यातील दर्जा वाढला आणि हौशी व व्यावसायिकातलं अंतर कमी होत संपलंही. गावोगावी असलेल्या मंचावरच्या आणि मंचामागच्या कलावंतानी आपला दर्जा एवढा उंचावर नेला कि रसिकांची व्यावसायिक दर्जाची अपेक्षा स्थानिक पातळीवरही पूर्ण झाली.
या पार्श्वभूमीवर देवगडचा विचार करता समृद्ध प्रेक्षागृह होतं पण त्यांची भूक भागवणारा मंच नव्हता. पूर्वी देवगड मध्ये अनेक संगीत नाटकं व्हायची. २०१४ झाली संत गोरा कुंभार ही कलाकृती आर्ट्स सर्कल देवगड यांनी सादर केली. परंतु या अलीकडच्या काळात देवगड मधील रसिक अशा कलाकृतींची आतुरतेने वाट पाहत होते.
स्वरसुधा क्रिएशन्स, मिठबाव प्रस्तुत संगीत सौभद्र *या संगीत नाटकाचा शुभारंभ प्रयोग 11 जून रोजी अ. कृ. केळकर हायस्कूल वाडा देवगड* येथे पार पडतोय.
सगळी तिशीच्या जवळपासची प्रतिभावान मुलंमुली दशक्रोशीनं मंचाला आणि नव्या संचाला या शहराने दिली. या संगीत सौभद्र च्या निमित्ताने देवगड मध्ये पुन्हा एकदा सांगीतिक विचार सुरू झाले. गंभीर रिहर्सल्स सुरू झाल्या.गाणी आणि संवादाच्या ऊनपावसानं श्रावणाची चाहूल तयारी केली आणि तयारी साठी पडदा रंगमंच लपवील एवढी तयारी झाली. वाद्य ट्यून होऊ साथीला तयार आहेत. गळा आणि वाद्य यातली एकतानता रियाजानं अद्वैत झालीत.
या संगीत नाटकाचे दिग्दर्शन श्रीराम कुलकर्णी (मुंबई) हे करीत आहेत श्रीराम कुलकर्णी यांनी आजतागायत बरीच संगीत नाटकं आणि चित्रपट याचे दिग्दर्शन केले आहे. अशा अनुभवी दिग्दर्शकाचा सहवास आणि मार्गदर्शन या मुलांना लाभणे ही केवळ दैवी देणगी..! या कलाकृतीसाठी संगीत मार्गदर्शन स्वप्निल गोरे व प्रसाद शेवडे यांनी केले आहे तसेच पार्श्वसंगीत आजच्या घडीचा उत्तम म्युझिक अरेंजर अमित पाध्ये हा करीत आहे. सर्व कलाकार हे १६ ते 30 या वयोगटातील असल्याकारणाने ही अजरामर नाट्यसंपदा यांच्याकडून करून घेणे हे शिवधनुष्य पेलल्यासारखं होतं. परंतु या मुलांनी हे खूप छान पद्धतीने साकार करण्याचा प्रयत्न केला आहे. याचा अनुभव रसिकांना शुभारंभ प्रयोगाच्या वेळी येईल. साथसंगतीला तबल्यावर अभिनव जोशी व ऑर्गनवर प्रसाद शेवडे हे साथ करीत आहेत. प्रकाश योजना- अभिषेक कोयंडे, पार्श्वसंगीत संयोजन – आज्ञा कोयंडे, वेशभूषा- प्राची वाघ, स्मिता शेवडे व स्वरूपा सोमण हे पाहत आहेत.
आम्ही सर्वजण या शुभ प्रयोगासाठी अत्यंत आतुर आहोत आणि सर्व रसिकांना या संगीत नाटकाचा आस्वाद घेण्याचं आवाहन करतो.
***
संगीत सौभद्र हे संगीत नाटक आजपर्यंत अनेक प्रथितयश कलाकारांनी सादर केलं परंतु युवा कलाकारांनी एकत्र येऊन हे शिवधनुष्य पेलणं हे प्रथमच रंगभूमी वर घडलं असं मला वाटतं. आम्ही देवगडचे रसिक हे पाहण्यासाठी अत्यंत उत्सुक आहोत. सर्वाँना शुभेच्छा.. !
*- विलास पाध्ये, तबला वादक, देवगड*
***
देवगड सारख्या ग्रामीण भागात संगीत सौभद्र सारखी अजरामर कलाकृती सादर होणे आणि तीही शाळा कॉलेजमधील मुलांकडून हे फारच कौतुकास्पद आहे.. या सर्व टीमला भरपूर शुभेच्छा. याचे शतकोत्तर प्रयोग व्हावेत ही सदिच्छा..!
*-ऍड. सुमेधा देसाई, तळेबाजार*

लेखन – श्री. प्रमोद जोशी, श्री. मयुर कुलकर्णी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!