*कोकण Express*
*वेंगुर्ले येथे आयोजित स्व. एकनाथ ठाकूर स्मृती पुरस्कार सोहळा नियोजित तारखेला होणार नाही*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
यंदाच्या वर्षी स्व. एकनाथ ठाकूर स्मृती पुरस्कार सोहळा ११ जून २०२२ (शनिवार) रोजी दुपारी ३ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले शहरात मधुसूदन कालेलकर सभागृहात नियोजित करण्यात आला होता. सदरील सोहळ्यात यंदाचा म्हणजेच चौथा एकनाथ ठाकूर स्मृती पुरस्कार जेष्ठ अभिनेते, व्याख्याते आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचे अभ्यासक श्री शरद पोंक्षे यांना देण्यात येणार होता. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री तसेच भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते देण्यात येणार होता. या सोहळ्याचा भाग म्हणून ‘समाजसुधारक सावरकर’ या विषयावर शरद पोंक्षे यांचे जाहीर व्याख्यान सुद्धा आयोजित करण्यात आले होते. परंतू दुर्दैवाने काल शुक्रवार ३ जून २०२२ रोजी सन्माननीय सुधीर मुनगंटीवार यांच्या वडिलांचे (डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार) नागपुरात निधन झाल्याने हा सोहळा पुढे ढकलल्याचे कार्यक्रमाचे समन्वयक डॉ अमेय देसाई यांनी सांगितले. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक, लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे अध्यक्ष, चिन्मय मिशनचे अध्यक्ष, डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीचे अध्यक्ष अशा विविध जबाबदा-या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या. १९६७ मध्ये त्यांनी भारतीय जनसंघातर्फे चंद्रपूर विधानसभेची निवडाणूक देखील लढवली होती. असे असताना नैतिकदृष्ट्या हा सोहळा पुढे ढकलणे संयुक्तिक होईल असे कुडाळदेशकर सार्वजनिक गणेशोत्सव तथा मातोश्री कलाक्रीडा मंडळ यांच्यावतीने डॉ.अमेय देसाई यांनी नमूद केले तसेच पुरस्कार सोहळ्याची तारीख आपण लवकरच जाहीर करणार असल्याचे सुद्धा सांगितले.