*कोकण Express*
*नगरवाचनालयाच्या 362 वाचकांपैकी एकाही वाचकाचा मोर्चात सहभाग नाही*
*मोर्चा काढणार्यांचे हे दुर्दैव…!*
*तो मोर्चा शिवसेनेचाच; नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी लगावला टोला…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिवसेना नेत्यांना नगरवाचनालयाच्या प्रगतीशी काही देणेघेणे नाही. त्यांना केवळ राजकारण करायचे आहे. कणकवली नगरपंचायतीची निवडणूक डोळयासमोर ठेवून शिवसेेनेकडून नगरवाचनालयाची बदनामी केली जात आहे. हे सुजान वाचकांच्या लक्षात आल्यानेच कणकवलीत शिवसेेनेने काढलेला मोर्चा पूर्णपणे फेल गेला. नगरवाचनालयाच्या 362 वाचकांपैकी एकही वाचक यामध्ये सहभागी झाला नाही. मोर्चा काढणार्यांचे हे दुर्दैव आहे. हा मोर्चा शिवसेनेचाच होता असा टोला कणकवलीचे नगराध्यक्ष आणि नगरवाचनालयाचे उपाध्यक्ष समीर नलावडे यांनी लगावला.
कणकवली नगरवाचनालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी वाचनालयाचे सचिव हनीप पिरखान, सदस्य मेघा गांगण, रविंद्र मुसळे, कल्पना सावंत, श्री. तानवडे आदी उपस्थित होते. समीर नलावडे म्हणाले, आ. वैभव नाईक हे या वाचनालयाचे वाचक आहेत. मात्र त्यांचाही त्यांच्या पदाधिकार्यांवर विश्वास नसल्याने ते आजच्या मोर्चात सहभागी झाले नाहीत. ग्रंथालय विभाग पालकमंत्र्यांकडेच आहे. त्यामुळे शिवसेेनेच्या पुढार्यांनी राजकारण न करता नगरवाचनालयाला सढळ हस्ते मदत केली असती तर आ. नितेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले असते. आ. राणे यांनी स्वतःच्या खिश्यातले 5 लाख ग्रंथालयासाठी दिले आहेत. मोर्चा काढणार्यांपैकी सतीश सावंत, संदेश पारकर, सुशांत नाईक यांनी नगरवाचनलयासाठी प्रत्येकी 5 लाख द्यावेत त्यांचा आम्ही जाहीर सत्कार करु, असे नलावडे म्हणाले.
नगरवाचनालयाच्या नुतनीकरणाचे काम थांबले आहे, हे आम्ही मान्य करतो. ना. राणे यांच्या फंडातून 25 लाखाच्या निधीची मागणी केली आहे. मात्र तो जर निकषात बसला नाही तर आ. नितेश राणे हे स्वखर्चातून नुतनीकरण करणार आहेत.इमारतीचे नुतनीकरण झाले की, त्याच्या उद्घाटनाला आम्ही विरोधकांनाही बोलवणार आहोत. संदेश पारकर यांनी वाचनालयाला कधी चार पुस्तकेही दिली नाहीत. त्यांना आपण वाचनालयाचे आजीव सभासद केले. आजच्या मोर्चामध्ये एकही वाचक नव्हता तर शिवसेनेचेच कार्यकर्ते आणि ठेकेदार होते. कणकवलीतील केवळ साडे अकरा कार्यकर्ते होते. त्यामुळे मोर्चाचा फज्जा उडाला. साहित्य, वाचन संस्कृती जोपासणारा स्वतंत्र वर्ग आहे, तो राजकारण्यांच्या दावणीला कधीही बांधला जात नाही. आजच्या मोर्चात साहित्य, वाचन संस्कृतीतला एकही माणूस नव्हता. ग्रंथालयांच्या दुरावस्थेस पालकमंत्री जबाबदार आहेत हे संदेश पारकर यांनी मान्य केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. पारकर पर्यटन विकास समितीचे उपाध्यक्ष झाले आणि मालवणात दोन पर्यटक बुडाले. पर्यटन व्यवसाय ठप्प झाला, हा त्यांचा पायगुण आहे असा टोला समीर नलावडे यांनी लगावला.
ते म्हणाले, कोविड काळात कर्मचार्यांचे पगार अनेक ठिकाणी झाले नाहीत. मात्र आमच्या कार्यकारीणी पदाधिकार्यांनी स्वतःच्या खिशातून कर्मचार्यांचे पगार दिले. वाचनालयात 25 हजार नव्हे तर 2 ते 3 हजार पुस्तके बांधून ठेवली आहेत. सर्व पुस्तके सुस्थितीत आहेत आणि वाचकांच्या मागणीनुसार आम्ही उपलब्ध करुन देत असल्याचे समीर नलावडे व मेघा गांगण यांनी सांगितले. ज्यावेळी सतीश सावंत यांनी राणेंची साथ सोडली त्यानंतर प्रत्येक निवडणूकीत त्यांचे स्वप्न भंगले. विरोधकांचा जीव नगरपंचायतीमध्ये अडकला आहे. आमच्या कारभारात काही त्रूटी असतील तर नगरपंचायतीवर मोर्चा आणा, आम्ही उत्तरे देवू. पण नगरवाचनालयाची बदनामी करु नका. अनेकांच्या कष्टातून आणि योगदानातून हे वाचनालय उभे राहिले आहे. वाचनालयाची बदनामी करू नका. जे जे नगरवाचनालयाला देणगी देतील त्यांचा सत्कार करू असे समीर नलावडे यांनी सांगितले.