*कोकण Express*
*कणकवली नगरवाचनालयात ३५ हजारपैकी २५ हजार पुस्तके बांधून ठेवण्याची आली वेळ…*
*दुरावस्थेला अध्यक्ष व पदाधिकारी जबाबदार…!*
*नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर यांचा आरोप!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली नगरवाचनालयाच्या दुरावस्थेला विद्यमान अध्यक्ष व पदाधिकारी जबाबदार आहेत. ३५ हजार पुस्तकांपैकी जागेअभावी २५ हजार पुस्तकें बांधून ठेवण्याची वेळ आली असून आप्पासाहेब पटवर्धन यांनी १९५३ साली सुरू केलेल्या कणकवली नगरवाचनालयाची दुरावस्था झाली आहे. तर वाचक संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जात असल्याचा आरोप युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक , नगरसेवक कन्हैया पारकर व इतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला.
कणकवली नगरवाचनालयाला युवासेनेचे जिल्हाप्रमुख तथा कणकवली नगरपंचायत विरोधी गटनेते सुशांत नाईक , माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर , शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव , शिवसेना कणकवली शहरप्रमुख शेखर राणे , भूषण परूळेकर , तेजस राणे , प्रसाद अंधारी, सिद्धेश राणे , आदित्य सापळे यांनी भेट देत पाहणी केली यावेळी नगरवाचनालयाचे सचिव हनिफ पिरखान व ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते. ३५ हजार पुस्तकांपैकी जागेअभावी २५ हजार पुस्तकें बांधून ठेवली आहेत . चारवर्षापुर्वी नगरवाचनालय नुतनीकरणाच्या नावाखाली वरती हॉलमध्ये घेण्यात आले.
मात्र , अद्याप काहीच झालेले नाही . अनेक जेष्ठ वाचकांनी पाठ फिरविली आहे . तर जुन्या संचालकांनीही राजीनामे दिले आहेत . नगरवाचनालयाच्या या दुरावस्थेला विद्यमान अध्यक्ष व पदाधिकारी जबाबदार असून वाचक संस्कृती नष्ट करण्याचा घाट घातल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नगरवाचनालाची पाहणी केली व माहिती घेतली . यावेळी नुतनीकरणासाठी निधी नसताना चार वर्षापुर्वी वाचनालय वरती हॉलमध्ये घेण्यात आले आतापर्यंत पुढे कोणतीही कार्यवाही झालेली नाही . हॉलमध्ये पुस्तके ठेवण्यासाठी कपाटे नसल्याने २५ हजार पुस्तके बांधून ठेवलेली आहेत . केवळ १० हजार पुस्तके रॅकवर आहेत .
तसेच पहिल्या मजल्यावर हे वाचनालय घेण्यात आल्याने ज्येष्ठ वाचकांनीही पाठ फिरविल्याची माहिती पुढे आली . ऐतिहासीक वारसा असलेल्या या नगरवाचनालयाच्या दुरावस्थेला गेल्या चार ते पाच वर्षापासून सुरूवात झाली . नुतन अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचे वाचनालयाकडे लक्षच नाही . केवळ सत्तास्थाने आपल्या ताब्यात असावीत , या उद्देशाने हे वाचनालय ताब्यात घेण्यात आले . मात्र गेली ६८ वर्षे वाचन संस्कृती जोपासणारे वाचनालय आता बंद पडण्याच्या स्थितीत आले आहे . वाचनालयाचे नियमित ३२० ते अजिव १९१ सभासद आहेत . नविन सभासद होत नाहीत . जुन्या संचालकांनी राजीनामे का दिले ? असा सवाल सुशांत नाईक व कन्हैया पारकर यांनी केला . यावेळी खासदार निधीतून आम्हाला २५ लाखांची गरज असल्याचे श्री . पिरखान यांनी सांगितले . यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करताना त्यांनी कर्मचाऱ्यांना कमी पगार असल्याने ते काम सोडत आहेत .
शासनाने अनुदान वाढवून देण्यासाठी पालकमंत्र्यांकडे प्रयत्न करा असे सांगितले . त्यावर वाचनालय नुतनीकरण व वाढीव अनुदानासाठी पत्र द्या , आम्ही पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देऊ , अशी ग्वाही सुशांत नाईक यांनी दिली .