अखेर सिंधुदुर्गात टोलवसुलीची तारीख झाली निश्चित

अखेर सिंधुदुर्गात टोलवसुलीची तारीख झाली निश्चित

*कोकण Express*

*अखेर सिंधुदुर्गात टोलवसुलीची तारीख झाली निश्चित…*

*सिंधुदुर्गातील विरोधानंतरही 1 जून तारीख जाहीर..*

*जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्ष, नेते, जनतेच्या भूमिकेकडे लक्ष*

*कणकवली ः संंजना हळदिवे*

अखेर गेली दोन वर्षे चर्चा सुरू झालेल्या व सिंधुदुर्ग जिल्हा वासियांच्या डोक्यावर टांगती तलवार असलेल्या टोलधाडी चा मुहूर्त निश्चित झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध स्तरातून ओसरगाव टोल नाक्यावरील टोल वसुलीला विरोध झाल्यानंतर देखील अखेर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या कडून टोल वसुली बाबत अधिकृत तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार 1 जून पासून सिंधुदुर्गात कणकवली मध्ये ओसरगाव टोलनाक्यावर एम डी करीमुन्निसा या ठेकेदार कंपनी मार्फत टोल वसुली करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.  याच दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील हातिवले येथीलही टोल नाका सुरू होणार आहे. सोमवारी या बाबतची अधिकृत जाहीर सूचना प्रसिद्ध देखील करण्यात आली. त्यामुळे आता टोल वसुलीबाबत येत्या काळात जिल्ह्यात काय घडामोडी घडणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्यावतीने  नोटीस जाहीर करण्यात आली आहे. या नोटीस मध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 हा (पनवेल इंदापूर विभागातील 00 ते 84 की. मी पर्यंतचे अंतर वगळून) महाराष्ट्र राज्य सरकारकडे सुपूर्द केला गेला असल्याचे या जाहीर केलेल्या अधिसूचने मध्ये म्हटले आहे. तसेच जानवली ते पत्रादेवी या विभागातील (की. मी 395 ते 460.410) या अंतरापर्यंत च्या साठ किलोमीटर लांबी करिता एम डी करीमुन्नीसा हैदराबाद या टोल ठेकेदार कंपनी मार्फत टोल वसुली सुरू करण्यात येणार आहे. तशी अधिकृत जाहीर सुचना भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण परियोजना कार्यक्षेत्र कोल्हापुर चे अधिकारी पी. डी. पंदरकर यांनी दिली आहे. तसेच श्री पंदरकर यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा देखील दिला आहे. त्यामुळे कितीही विरोध झाला तरी बहुधा सिंधुदुर्गातील ओसरगाव टोल नाक्यावर टोल वसुली आता सुरू होण्याचा मार्ग प्रशासकीय पातळीवर मोकळा झाला आहे. सिंधुदुर्गातील ओसरगाव व रत्नागिरीतील हातिवले या दोन्ही टोल नाक्या करिता एकच टोल ठेकेदार कंपनी नियुक्त करण्यात आली आहे. ओसरगाव टोलनाक्‍यावरून जाणाऱ्या कार, जीप, व्हॅन आदी लाईट मोटर व्हेईकलच्या सिंगल एन्ट्रीसाठी 90 रूपये तर एका दिवसांत जाण्या-येण्यासाठी 135 रूपये दर ठेवण्यात आला आहे. याचधर्तीवर हलकी व्यवसायिक वाहने, मोठी मालवाहू वाहने, मिनीबससाठी सिंगल एन्ट्री 145 रूपये आणि जाण्या – येण्यासाठी 220 रूपये, ट्रक आणि बससाठी (दोन ॲक्‍सल) 305 आणि जाण्या-येण्यासाठी 460 रूपये, तर थ्री ॲक्‍सल व्यावसायिक वाहनांसाठी 335 आणि जा – ये करण्याकरिता 500 रूपये,  मल्टी ॲक्‍सल, अर्थमूव्ह किंवा अवजड बांधकाम मशनरी या चार ते सहा ॲक्‍सल वाहनांसाठी 480 आणि जाणे-येणे करण्याकरिता 720 रूपये तर सात किंवा त्‍या पुढील ॲक्‍सल अवजड वाहनांसाठी 584 आणि जा करण्याकरिता 875 रूपये असा दर निश्‍चित करण्यात आला आहे. तसेच  या सर्व वाहनांसाठी मासिक पासचेही दर निश्‍चित करण्यात आले आहेत. दरम्‍यान ओसरगाव टोलनाक्‍यापासून 20 किलोमिटर परिघातील वाहनांना टोलनाक्‍यातील रक्कमेत 50 सूट देण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. यात MH 07 पासिंग ची वाहने व वीस किलोमीटर परिघातील जिल्हा अंतर्गत नोंदणीकृत व्यवसायिक असलेल्या कार, जीप, व्हॅन आदींसाठी 45 रूपये, मिनीबससाठी 75 रूपये, ट्रक आणि बससाठी 155 रूपये तर थ्री ॲक्‍सल वाहनांसाठी 165 रूपये, चार ते सहा मल्टी ॲक्‍सल वाहनांसाठी 240 रूपये आणि त्‍यापुढील अवजड वाहनांसाठी 290 रूपये असा एकेरीच्या 50 टक्के मर्यादित पास असणार आहे. वीस किलोमीटर परिघातील व MH07 पासिंग च्या स्थानिक वाहनांसाठी 315 रूपयांचा मासिक पास दर निश्‍चित करण्यात आला आहे. तसेच कार जीप या वाहनांकरिता एका महिन्यात पन्नास वेळा एकेरी प्रवासाकरीता 3015, तसेच हलकी मालवाहू मिनीबस याकरिता 4870 ट्रक व बस करिता 10200, व्यवसायिक वाहने थ्री ॲक्‍सल 11 हजार 130, मल्टी एक्सल वाहने अवजड मशनरी याकरिता 15 हजार 995, तसेच मोठ्या आकाराच्या वाहनांकरिता हात किंवा त्याहून जास्त एक्सेल 19 हजार 475 त्यानुसार एका महिन्यात 50  एकेरी प्रवासाकरीता पास देण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या टोलवसुलीला गेले काही दिवस जोरदार विरोध झाल्यानंतर देखील टोल वसुली ची तारीख जाहीर झाल्याने आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय पक्ष, त्यांचे नेते व जनता यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!