*कोकण Express*
*माडखोल येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीची महिलेला धडक…*
*दोघे जखमी; सावंतवाडी पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
भरधाव वेगाने जाणारी दुचाकी महिलेला आदळून अपघात झाला. ही घटना काल रात्रीच्या सुमारास माडखोल-फुगेवाडी परिसरात घडली. या अपघातात दुचाकी चालकासह संबंधित महिला ही जखमी झाली आहे. प्रियांका तायशेट्ये (५८) रा. फुगेवाडी, असे जखमी महिलेचे नाव आहे. तिला कुडाळ येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तर दुचाकी चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला थेट ओरोस रुग्णालयात हलविण्यात आले. त्यामुळे पोलिसांना त्याच्या विषयी अधिक माहिती मिळू शकली नाही. दरम्यान पांडुरंग तायशेट्ये यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात दुचाकी चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित दुचाकीचालक आपल्या ताब्यातील गाडी घेऊन आंबोलीहून सावंतवाडीच्या दिशेने जात होता. यावेळी माडखोल-फुगेवाडी परिसरात तो आला असता त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला व दुचाकी उडून रस्त्याच्या शेजारी दुकानाकडे उभ्या असलेल्या महिलेवर आदळली. यात चालकासह त्या महिलेला दुखापत झाली. दरम्यान संबंधित महिलेला कुडाळ रुग्णालयात हलविण्यात आले. तर गंभीर जखमी दुचाकीचालकाला थेट ओरोस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या विषयी अधिक माहिती मिळू शकली नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. तर जखमी महिलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या दुचाकी चालकावर सावंतवाडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.