*कोकण Express*
*अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट चे शैक्षणिक क्षेत्रात महान कार्य : प्राचार्य अभयकुमार साळुंखे*
*शशिराव शेंडगे यांनी पुतणीच्या विवाहाप्रित्यर्थ दिली 51 हजाराची देणगी*
*कासार्डे : संजय भोसले*
कोरोनाच्या काळात गेल्या दोन वर्षापासून अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टने राज्यातील विविध सात जिल्ह्यातील गरिब मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष प्रविण काकडे विशेष कार्य करीत असून हे त्यांचे कार्य भविष्यात पुढेही सुरु रहावे, यासाठी त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी केले. यावेळी शशिराव शेंडगे यांनी आपल्या पुतणीच्या विवाहाप्रित्यर्थ प्रविण काकडे यांच्या कार्यासाठी 51 हजाराची देणगी देऊन वेगळा पायंडा पाडला.
सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे व रायगड या सातही जिल्ह्यातील डोंगर-दऱ्याखोऱ्यातील गोरगरीब मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करुन, महापुर व अतिवृष्टीत नुकसान झालेल्या भागातील व दरडग्रस्त भागातील मुलांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत प्रवीण काकडे यांनी घेतली.
प्रवीण काकडे यांनी कोरोना काळात 3293 मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप केल्याबद्दल सातारा जिल्ह्यातील काशीळ येथे शशीराव शेंडगे यांच्या पुतणीच्या लग्न समारंभात अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टला शशीराव शेंडगे यांनी प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचे हस्ते प्रवीण काकडे यांना विवाहाचे औचित्य साधून ५१००० रोख आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी प्रविण काकडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, माजी सहसचिव आर के भोसले, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवक पतसंस्थेचे चेअरमन उत्तमराव गलांडे, व्हा. चेअरमन शशीराव शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
*शैक्षणिक क्षेत्रातील कार्याला सलाम (चौकट)*
प्रवीण काकडे यांनी सात जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात यावेत, ते टिकावेत यासाठी विशेष प्रयत्न केलेत. विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राहू नये यासाठी त्यांना शैक्षणिक मदतही केली. याशिवाय नैसर्गिक आपत्ती काळातही काकडे यांनी भरघोस मदत केली. या त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याला अनेकांनी सलाम केला आहे.
*विवाहाप्रित्यर्थ सामाजिक संस्थेला मदत : वेगळा पायंडा (चौकट)*
आपल्या पुतणीच्या विवाहाचे औचित्य साधून अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याला अधिक गती देण्यासाठी शशिराव शेंड़गे यांनी 51 हजाराची देणगी दिली. अशाप्रकारे एक वेगळा पायंडा शेंडगे यांनी घातला आहे.