*कोकण Express*
*डंपरची कारला धडक ; तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर जखमी*
सावंतवाडीच्या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांच्या गाडीला बुर्डी पूल येथे अपघात झाला. समोरून येणाऱ्या डंपरची धडक त्यांच्या गाडीला बसली. अपघातात त्या जखमी झाल्या. भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. सावंतवाडी पोलिस घटनास्थळी पोहोचले असून अपघाताचा पंचनामा सुरू आहे. या अपघातात त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यांच्यासोबत आरोग्यसेवक संतोष तुळसकर हे देखील होते. त्यांनाही दुखापत झाली असून उपचार सुरु आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार डॉ. वर्षा शिरोडकर या आपले सहकारी आरोग्य सेवक संतोष तुळसकर यांच्यासोबत आंबोली येथे शासकीय कामकाजासाठी गेल्या होत्या. तेथून परतत असताना सावंतवाडीहून आंबोलीच्या दिशेने जाणाऱ्या डंपरची (एम. एच. ०७ एक्स १९८) जोरदार धडक कारला बसली. या अपघातात कारच्या (एम एच ४३ ए टी ७८५१) दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. तर कार मधील डॉ. वर्षा शिरोडकर त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. तर त्यांच्यासोबत असलेले आरोग्यसेवक संतोष तुळसकर त्यांच्या छातीला दुखापत झाली आहे. त्या दोघांवरही सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी त्यांना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.