*कोकण Express*
*नगराध्यक्ष नलावडेंनी शिवसेनेसोबत टोलविरोधी आंदोलनात सहभागी व्हावे*
*नगरसेवक कन्हैया पारकर यांची कणकवली नगराध्यक्षांना थेट “ऑफर”*
*नगरपंचायत मध्ये टेंडर हाताळल्यानेच नलावडे यांचा टेंडरचा अभ्यास!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली नगरपंचायत मध्ये टेंडरच्या विषयांचा अभ्यास केल्यामुळे नगराध्यक्ष समीर नलावडे यांना हायवेच्या टेंडर मधील गोलमाल समजला. अशी टीका नगरसेवक कन्हैया पारकर यांनी केली. कणकवलीत शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषदेत श्री पारकर बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत शहरप्रमुख शेखर राणे उपस्थित होते. श्री पारकर पुढे म्हणाले, काल समीर नलावडे यांनी कणकवली हायवे टोल वसुली च्या टेंडर मध्ये घोळ झाल्याचा आरोप केला. यात त्यांनी पहिल्या टेंडरची रक्कम व दुसऱ्या वेळेच्या टेंडरची रक्कम देखील स्पष्ट केली. परंतु नलावडे यांच्याच पक्षाचं केंद्रात सरकार असून, त्यात केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून नारायण राणे आहेत तर आमदार नितेश राणे हे त्यांच्या पक्षाचे आहेत. तसेच हा हायवे ज्या विभागाने केला त्या खात्याचे मंत्री केंद्रीय मंत्री म्हणून नितीन गडकरी आहेत. असे असताना या सर्वांवरच श्री नलावडे यांनी संशय व्यक्त केल्याचा टोला श्री पारकर यांनी लगावला. कणकवली नगरपंचायत चे सत्ताधारी म्हणून श्री. नलावडे यांनी अनेक टेंडर हाताळल्यामुळे त्यांचा या टेंडरमध्ये अभ्यास झाला व त्यांनी आरोप केले त्याबद्दल त्यांचे श्री पारकर यांनी उपरोधिक अभिनंदन देखील केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांच्या इशाऱ्या नुसारच नगराध्यक्ष नलावडे यांनी या टेंडरच्या घोळाची पोलखोल केली असा संशय श्री पारकर यांनी व्यक्त केला. त्यासोबत भाजपच्या मोदी सरकार काळात सिंधुदुर्गातील टोल टेंडर मध्ये घोळ झाला नलावडे यांनी मान्य केले. सिंधुदुर्गातील असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासारखे नेते केंद्रीय मंत्रिमंडळात असताना असताना हा घोळ कसा झाला? यात कोणत्या नेत्यांचा, अधिकाऱ्याचा हात आहे ते देखील श्री नलावडे यांनी जाहीर करावे. शिवसेनेची पहिल्या दिवसा पासून भूमिका ही MH07 च्या वाहनांना टोलमाफी द्यावी अशी होती व आहे. आमच्या भूमिकेला जर कोण सहमती देत असेल तर आम्ही त्यांचा पाठिंबा घेऊ. या टोल च्या टेंडर मध्ये नलावडे यांच्या सरकार चा हात असल्याने त्यांच्या पक्षातील लोक नलावडे यांना या विषयावर भूमिका घेण्यास थांबवू शकतात. त्यामुळे नलावडे यांनी आमच्यासोबत टोलविरोधी आंदोलनात सहभाग घ्यावा अशी थेट खुली ऑफरच कन्हैया पारकर यांनी नलावडे यांना दिली. तसेच हायवे चे 70 टक्के काम त्यांच्या सरकारने पूर्ण करून द्यावं अशी देखील मागणी श्री पारकर यांनी केली. टोल टेंडर मध्ये कोण आहेत? त्याची नावे नलावडे जाहीर करतील याची वाट आमच्यासह सर्वसामान्य जनता पाहत आहे असेही श्री पारकर यांनी सांगितले.