*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना टोल वसुलीतून सूट नाही दिल्यास अन्यथा भाजप आंदोलन करेल..*
*राजन तेली यांचा प्रशासनाला इशारा…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मुंबई-गोवा महामार्गावर करण्यात येणाऱ्या टोल वसुली मधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना सूट देण्यात यावी, अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी केली आहे. दरम्यान याबाबत योग्य तो निर्णय न झाल्यास भाजपच्या माध्यमातून आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. याबाबत श्री. तेली यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, राष्ट्रीय महामार्गावर कणकवली ओसरगाव येथे टोल नाका सुरू करण्यात येत आहे. उद्या पासून ओसरगाव टोलनाक्यावरून टोलवसुली सुरु करण्यात येणार असून यातून जिल्हावासीयांना सूट देण्यात यावी अन्यथा भाजपचा हिसका दाखवू, असा इशारा श्री. तेली यांनी दिला. तर याबाबत वाहनचालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. टोल नाक्याच्या परिसरापासून वीस किलोमीटर परिघामध्ये येणाऱ्या वाहनांना मासिक ३१५ रुपयाचा पास देण्यात येणार आहे. त्या व्यतिरिक्त इतर वाहनांना टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे ही टोल वसुली सिंधुदुर्ग वासीयांवर अन्यायकारक ठरणार आहे.