*कोकण Express*
*अज्ञानी खासदार असल्याचे निलेश राणेंनी देवबागवासीयांना दाखवून दिले…*
*प्रस्तावित १२ कामांमध्ये ‘त्या’ कामाचा समावेशच नाही…*
*हरी खोबरेकर यांची टीका*
*मालवण ः प्रतिनिधी*
देवबाग येथील बंधार्याच्या कामासाठी केंद्रीय मंत्र्यांनी एक कोटी रुपयांचा दिलेल्या निधीच्या कामास आम्ही आडकाठी आणलेली नाही. प्रत्यक्षात जिल्ह्यातील जी १२ कामे सीआरझेडसह अन्य परवानग्यांसाठी संबंधित कमिटीकडे पाठविली. त्यात या कामाचा समावेशच नाही. परवानग्यांची कोणतीही पूर्तता न करता घिसाईघाईने बंधार्याचे भूमीपूजन करत आपल्याला काहीतरी दाखवायचे आहे आणि तळाशीलवासियांची जशी दिशाभूल केली तशीच पत्र दाखवून देवबागवासियांची दिशाभूल करण्याचे काम माजी खासदार निलेश राणे यांनी केले आहे. कोणतीही परवानगी न घेता त्याचे खापर कोणताही ठोस पुरावा नसताना आमदारांवर फोडण्याचे काम ते करत असून आपण अज्ञानी माजी खासदार कसे आहोत हेही त्यांनी देवबागवासियांना दाखवून दिले अशी टीका शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.
शिवसेना शाखा कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मंदार केणी, मंदार ओरसकर, सन्मेश परब, नरेश हुले, यशवंत गावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. खोबरेकर म्हणाले, माजी खासदार निलेश राणे यांनी आपल्या कार्यकाळात जनतेसाठी काय केले, किती निधी आणला हे सांगण्याऐवजी ते सातत्याने आमदार, खासदार, पालकमंत्री यांच्यावर टीका करण्याचे काम करत आहेत. खरेतर त्यांनी त्यांच्याच पदाधिकार्यांकडून काही गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत. सीआरझेड मधील काम असेल तर त्याला केवळ निधी मंजूर असल्याचे पत्र देऊन चालत नाही. त्यासाठी सीआरझेड, एमसीझेड, कांदळवन समिती, पर्यावरण विभाग असेल या सर्व गोष्टींची पूर्तता करूनच त्या कामाची निविदा प्रक्रिया होते. केवळ पत्र देऊन काम होत नाही. परंतु केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा कमीपणा करण्याचे काम नीलेश राणे व त्यांच्या सभोवतालची मंडळी यांनी केले. एक केंद्रीय मंत्री देवबागात आणायचे. मंजुरीचे पत्र केवळ आणायचे, जिल्हाधिकार्यांना भेटायचे. या कामाला कोणीही आडकाठी आणलेली नाही. मात्र आवश्यक त्या परवानग्याच घेतलेल्या नाहीत. कोणतीही पूर्तता न करता घिसाडघाईने याठिकाणी आपल्याला काही तरी दाखवायचे आहे. तळाशीलवासियांची जशी दिशाभूल केली. तशीच पत्र देऊन देवबागवासियांची दिशाभूल करण्याचे काम निलेश राणे करत आहेत. परवानग्या घेऊन काम न करता त्याचे खापर आमदारांवर फोडण्याचे काम कोणताही ठोस पुरावा नसताना ते करत आहे. आपण अज्ञानी खासदार कसे आहोत हे त्यांनी देवबागवासियांना दाखवून दिले.
आम्ही सुरवातीलाच स्पष्ट केले की आमचा कोणत्याही विकासकामाला विरोध नाही. त्यामुळे या कामावरून आम्ही साधी टिका टिपणी केली नाही. विकासकामांना आमचा पाठिंबाच असेल यापेक्षाही मोठी पत्रे त्यांनी आणावीत. किनारपट्टीवरील जी कामे असतील ती त्यांनी खुशाल करावीत. लोकांची दिशाभूल आणि तात्पुरते ग्रामस्थांचे समाधान करण्याचे काम राणे करत आहेत.
तोक्तेची मदत आली त्यावेळी आमदारांवर टीका करणे सोपे होते. मुख्यमंत्र्यांवर टीका करणे सोपे होते. पण नुसते दौरे करून लोकांना आपण आश्वासने किती दिली. त्या आश्वासनांची पूर्तता रत्नागिरीपासून मालवणपर्यत किती केली याचे आत्मपरिक्षण निलेश राणे यांनी करावे.
येणार्या काळात आमदार, खासदार, पालकमंत्री यांच्यावर टीका करताना प्रथम अभ्यास करावा नंतरच टीका करावी. अन्यथा नाचता येईना अंगण वाकडे अशी त्यांची जी अवस्था आहे ती जनता पाहत आहे अशी टीकाही त्यांनी केली.
आज १२ कामे जिल्ह्यातील प्रस्तावित आहेत. या कामांबाबत सीआरझेडच्या ज्या काही परवानग्या आवश्यक असतात त्या संबंधित कमिटीकडे पाठविल्या आहेत. या कामांमध्ये नारायण राणेंच्या पत्राचा उल्लेख नाही. याचाच अर्थ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्याची परवानगी नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे राणेंचे आरोप आम्ही फेटाळत आहोत. आमदारांनी लोकांच्या भल्याचे निर्णय घेतले आहे. कोरोना काळात परवानग्या रखडल्या. त्याबाबत आमदारांनी दिलगिरीही व्यक्त केली. आमदार नाईक कशाप्रकारे काम करत आहेत हे जनतेला माहित आहे. त्यामुळे आम्हाला तुमच्या दाखल्याची आवश्यकता नाही. देवबाग खाडीकिनारच्या बंधार्यासाठी सात कोटीचा निधी मंजूर झाला आहे. मात्र त्याचे आम्ही भूमीपूजन न करता त्या कामाच्या ज्या आवश्यक परवानग्या आहेत त्या मिळविण्याचे काम सुरू असून लवकरच त्या परवानग्या मिळाल्यानंतर प्रत्यक्षात या बंधार्याचे कामही मार्गी लावले जाईल असेही श्री. खोबरेकर यांनी स्पष्ट केले.
@_