*कोकण Express*
*संघटनात्मक कौशल्याच्या जोरावरती चांगले कार्य उभे करुन संघटनेची ताकद वाढवूया – महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनश्याम सांडीम यांचा विश्वास*
*ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे तळेबाजार येथे जिल्हास्तरीय मार्गदर्शन शिबिर संपन्न*
*कासार्डे:संजय भोसले*
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग जिल्ह्याची टीम संतोष नाईक यांच्या अध्यक्षतेखाली खूप चांगल्या रितीने कार्यरत राहिली.सामाजिक बांधिलकी स्वीकारून विविध सामाजिक प्रश्नाबाबत आवाज उठवून अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचे चांगले काम करुन आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला.त्यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय व राज्य संघटनेने संतोष नाईक यांच्याकडे कोकण विभागीय अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपविली आहे.नुतन विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांच्याकडे संघटनात्मक कौशल्य चांगल्याप्रकारे अवगत असल्याने निश्चितच हे शिवधनुष्य पेलून आपले कार्य निश्चितच सिद्ध करून दाखवतील असा विश्वास ह्युमन राईट असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनश्याम सांडीम यांनी व्यक्त केला.
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसाठी तळेबाजार येथील महालक्ष्मी हाॅल येथे जिल्हास्तरीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
या मार्गदर्शन शिबीराला संघटनेचे महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनश्याम सांडीम, ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कार्यालयीन प्रशासकीय अधिकारी राकेश शिंदे,सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते चंपकभाई शहा, कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष मनोज तोरसकर,जिल्हा सचिव किशोर नाचनोलकर तसेच सर्व जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते.
तसेच संघटना वाढीसंदर्भात मार्गदर्शन करतांना कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक म्हणाले की,संघटनेमध्ये काम करत असतांना सर्वांना सोबत घेऊन काम करणे आवश्यक असते.आपल्यामुळे संघटना नसते तर संघटनेमुळे आपण आहोत ही भावना नेहमी मनामध्ये ठेऊन कार्यरत राहिले पाहिजे.आपल्या संघटनेच्या माध्यमातून चांगल्या आणि सातत्यपूर्ण कामगिरीमुळे कोणतेही काम यशस्वीपणे मार्गी लागते ही संघटनेची खरी ताकद आहे.यासाठी आपण नेहमी चाणाक्ष राहून समाजातील विविध सामाजिक प्रश्न किंवा समस्या शोधण्याचा दृष्टीकोन ठेवला पाहिजे.आणि त्यासाठी नेहमी सकारात्मक राहून जनतेच्या प्रश्नावरती राळ उठविण्याची गरज असते.सर्वसामान्य व्यक्तीला न्याय मिळवून देऊन संघटना वाढीसाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम करुया.चांगल्या व विधायक कार्यासाठी तालुका व जिल्हा संघटना सदैव आपल्या पाठीशी उभी राहिल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
तसेच महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनश्याम सांडीम यांनी मानवाचे अधिकार व कर्तव्य यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शन केले.
यावेळी संघटनेचे नवनिर्वाचित कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मनोज तोरसकर यांच्याकडे संघटनेची रित्सर जबाबदारी सोपविण्यात येऊन त्यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत पदभार स्विकारला.
सदरचे एक दिवशीय शिबीर जिल्हा संघटक मंदार काणे, जिल्हा उपाध्यक्ष नंदन घोगळे, तसेच देवगड तालुका अध्यक्ष योगेश ( बाळा) धुपकर यांच्या मागणीनुसार तळेबाजार येथे आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष नंदन घोगळे यांनी केले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी केले.तर शेवटी आभार जिल्हा संघटक मंदार काणे यांनी मानले.