*कोकण Express*
*ओसरगाव टोलमाफीसाठी सर्वांनी पक्षभेद विसरुन एकत्र या ; मनसे नेते परशुराम उपरकर*
*सिंधुदुर्गवासियांनी कोल्हापूरी आंदोलन करण्याचे पत्रकार परिषदेत आवाहन..*
*सिंधुदुर्ग :*
जिल्ह्यातील वाहनांना ओसरगाव टोलनाक्यावर टोलमाफी मिळायला हवीच. अन्यथा ज्याप्रमाणे कोल्हापूरवासीयांनी कोल्हापूर शहरातील टोलनाके बंद पाडले त्याच धर्तीवरील आंदोलनासाठी सिंधुदुर्गवासीयांनी पक्षभेद विसरून एकत्र यावे असे आवाहन मनसे नेते परशुराम उपरकर यांनी केले. ते जिल्ह्यातील कणकवली येथील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते.
श्री. उपरकर म्हणाले, जिल्ह्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ओसरगाव येथील टोलनाक्याच्या ठिकाणी लवकरच टोलनाका सुरू होणार असल्याचे पत्रक वाटप करून गाड्यांची नंबर नोंद केली जात होती. याबाबत टोलवसुली कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे वर्क ऑर्डर नव्हती. तसेच कोणत्या गाडीला किती रक्कमेचा टोल असणार याची माहिती नव्हती. प्रत्यक्षात टोलनाका हाताळणीची तारीख वर्क ऑर्डरमध्ये नव्हती. त्यामुळे ओसरगाव टोलनाक्यावर धडक देत कर्मचाऱ्यांना जाब विचारत वाहन अडकविण्याचे धंदे बंद करण्यास भाग पाडले.
ते पुढे म्हणाले, हायवेचे काम अद्यापही अपूर्ण आहे. वागदे गावात तर एक लेन बंद आहे. ओसरगाव टोलनाक्यावर पब्लिक टॉयलेट नाही, वाहनांसाठी वजन काटा नाही. कणकवली शहरात हायवे ब्रिजचे निकृष्ट काम झाल्यामुळे त्या भागातून वाहतूक बंद आहे. या अवस्थेत टोल वसुली करणे चुकीचे आहे. याबाबत हायवे औथोरिटी कार्यालयाशी संपर्क साधला असता १ जून पासून टोलवसुली सुरू होणार असुन याबाबतची जाहिरात स्थानिक वृत्तपत्रात दिली जाणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफी द्यावी. अन्यथा ज्याप्रमाणे कोल्हापूर वासीयांनी कोल्हापूर शहरातील टोलनाके बंद पाडले तसेच सिंधुदुर्गवासीयांनी पक्षभेद विसरून आवाज उठवणे गरजेचे आहे. असे श्री. उपरकर म्हणाले.

