*कोकण Express*
*तळेरे येथील सर्व्हिस रस्त्यावरील खोदकाम अधिकृत की अनधिकृत?*
*कासार्डे:संजय भोसले*
तळेरे येथील मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या लागून असलेल्या सर्व्हिस रस्त्यांवर वेळोवेळी सुरू असलेले खोदकाम अधिकृत की अनधिकृत असा सवाल ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेकशन या मानवाधिकार संघटनेचे कणकवली तालुका उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी उपस्थित केला आहे.
शासनाच्या अखत्यारीत असलेल्या कोणत्याही रस्त्यावर अथवा जमिनीवर कोणत्याही स्वरूपाचे खोदकाम करावयाचे असल्यास त्याबाबत संबंधितांना नियमोचितरीत्या संबंधित प्रशासनाची लेखी परवानगी घेऊन आवश्यक त्या कायदेशीर अटी – शर्तीची पूर्तता करावी लागते.अन्यथा सदरचे खोदकाम हे अनधिकृत ठरून त्याबाबत संबंधितांवर कायदेशीर कारवाई प्रस्तावीत केली जाऊ शकते.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामकाजाच्या अनुषंगाने निर्माण करण्यात आलेले तळेरे येथील सर्व्हिस रस्ते हे मंजूर आराखड्यानुसार किमान साडे पाच मीटर रुंद असणे आवश्यक आहे. परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती पाहता काही ठिकाणी सदरचे सर्व्हिस रस्ते हे अरुंद बनविण्यात आलेले आहेत.अशा परिस्थितीत संबंधितांकडून वेळोवेळी सर्व्हिस रस्त्याखाली भुअंतर्गत पाईपलाईन अथवा वाहिनी घालण्यासाठी सर्व्हिस रस्ते यंत्राच्या साहाय्याने खोदले जात आहेत. यास्तव सदर सर्व्हिस रस्त्यांच्या पृष्ठभागासह अंतर्गत भू -भागाचे अतोनात नुकसान होत असून त्यामुळे भविष्यात सदरच्या सर्व्हिस रस्त्यांवर मोठे खड्डे पडण्याचा अथवा अंतर्गत भू-भाग मोठ्या प्रमाणावर खचण्याचा संभाव्य धोका आहे. परिणामी एखादेवेळी रस्ते-वाहन अपघाताची दुर्घटना देखील घडू शकते त्याला जबाबदार कोण?
एकंदरीत या सर्व बाबी सर्वसामान्य जनतेसाठी नाहक त्रासदायक ठरणाऱ्या असून त्याअनुषंगाने दक्षता व गांभीर्यपूर्वक सदरच्या खोदकामाबाबत संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाशी संपर्क साधून चर्चा केली असता त्यांचेकडून तशी कोणत्याही स्वरूपाची परवानगी कोणासही दिली नसल्याचे सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे सदरचे खोदकाम हे अधिकृत की अनधिकृत? असा सवाल उपस्थित करून वारंवार अनधिकृतपणे खोद काम करुन सर्व्हिस रस्त्याची दुर्दशा करणाऱ्या संबंधित केबलच्या ठेकेदारावरती दंडात्मक कारवाई करणार का? अन्यथा याबाबत सर्वसामान्य जनतेसाठी आपणाला आवश्यक ती न्यायिक दाद लोकशाही व संविधानिक मार्गाने मागावी लागेल असा इशारा ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेकशन या मानवाधिकार संघटनेचे कणकवली तालुका उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी दिला आहे.