*कोकण Express*
*कासार्डे येथे महामार्गाच्या दुभाजकावर महावितरण कंपनीने अनधिकृतपणे उभारलेला विद्युत खांब तात्काळ हटवावा*
*ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेकशन या संघटनेचे कणकवली तालुका उपाध्यक्ष राजेश जाधव यांची मागणी*
*कासार्डे :प्रतीनीधी*
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागी कासार्डे पेट्रोल पंपनजिक संबंधित महावितरण कंपनीच्या विभागाने अनधिकृतरित्या उभारलेला विद्युत खांब रस्ते – वाहन अपघात दक्षतेच्या कारणास्तव तात्काळ हटवावा व सदर विद्युत खांबाच्या साहाय्याने महामार्गावरून ओढलेल्या विद्युत तारांच्या माध्यमातून सुरू असलेला विद्युत पुरवठा पर्यायी योग्य सुरक्षित मार्गाने सुरू करावा. अशी मागणी ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेकशन या मानवाधिकार संरक्षण संघटनेचे कणकवली तालुका उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी केली आहे.
सुमारे महिनाभरापूर्वी कासार्डे येथे मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागी दुभाजकावर महावितरण कंपनीने विद्युत खांब उभारला असून त्या सहाय्याने महामार्गावरून विद्युत तारा ओढलेल्या आहेत.या विद्युत तारांच्या माध्यमातून सध्या विद्युत पुरवठा सुरू आहे. सदर कामाबाबत संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विभागाशी संपर्क साधून चर्चा केली असता महावितरण कंपनीला महामार्गाच्या दुभाजकावर विद्युत खांब उभारण्यास व त्यासहाय्याने महामार्गावर विद्युत तारा ओढून त्याद्वारे विद्युत पुरवठा सुरू करण्याबाबत कोणत्याही स्वरूपाची पूर्व अनुमती देण्यात आली नसल्याची बाब संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेली आहे.तसेच सदर कामाबाबत संबंधित महावितरण कंपनीच्या विभागाशी संपर्क साधून चर्चा केली असता विद्युत पुरवठा करणारी भुयारी विद्युत वाहिनी तुटल्याने खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरळीत सुरु ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तात्पुरत्या स्वरूपात महामार्गाच्या दुभाजकावर विद्युत खांब उभारल्याचे व त्यासहाय्याने महामार्गावर विद्युत तारा ओढून त्याद्वारे विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला असल्याची बाब संबधीत महावितरण कंपनीच्या विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेली आहे.
जरी असे असले,तरी सदर कामाबाबत संबंधीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विभागाची कोणत्याही स्वरूपाची पूर्व अनुमती संबंधित महावितरण कंपनीच्या विभागाने घेतलेली असल्याचे निदर्शनास येत नाही. सबब सदरचे काम हे कायदेशीररीत्या अनधिकृत असेच आहे. तसेच महामार्गावरील वेगवान वाहतूक लक्षात घेता सदर काम हे रस्ते – वाहन अपघात दक्षतेचा गांभीर्यपूर्वक विचार करून संबंधित महावितरण कंपनीच्या विभागाने केलेले असल्याचे निदर्शनास येत नाही.त्यामुळे सदर कामामुळे तेथे कोणत्याही स्वरूपाची दुर्घटना अथवा हानी घडून त्याचा सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित महावितरण कंपनीच्या विभागाची असणार आहे.
तसेच सदरचे काम संबंधित महावितरण कंपनीच्या विभागाने तात्पुरत्या स्वरूपात म्हणून अनधिकृतरित्या केलेले असले तरी सुमारे एक महिना उलटून गेल्यावर देखील सदर कामाबाबत कोणतीही ठोस पर्यायी उपाययोजना संबंधित महावितरण कंपनीच्या विभागाकडून करण्यात आलेली असल्याचे निदर्शनास येत नाही.सदर काम अद्याप तसेच स्थित असून ते आत्ता तात्पुरत्या स्वरुपात उरले असल्याचे देखील निदर्शनास येत नाही.
तरी सदर प्रकरणी गांभीर्यपूर्वक करण्यात आलेल्या मागणीच्या अनुषंगाने संबंधित महावितरण कंपनीच्या विभागासह संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने देखील तात्काळ गांभीर्यपूर्वक लक्ष घालून आवश्यक ती नियमोचित कार्यवाही विनाविलंब करावी.अन्यथा लोकशाही व संविधानिक मार्गाने संबंधित विभागांच्या वरिष्ठ कार्यालयांशी संपर्क साधून आवश्यक ती न्यायिक दाद मागावी लागेल असा इशारा ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेकशन या मानवाधिकार संरक्षण संघटनेचे कणकवली तालुका उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी दिला आहे.