*कोकण Express*
*”कणकवली गणपती साना ते कलेश्वर मंदिर, वागदे गडनदी, खारेपाटण नदी या नदी पात्रातील गाळ त्वरीत काढण्याचे आदेश द्या”*
*संदेश पारकर यांची पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी*
कणकवली तालुक्यात सन २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कधी नव्हे ते कणकवली गणपती साना ते कलेश्वर मंदिर परीसर, वागदे गडनदी परीसर तसेच खारेपाटण नदी पात्रातील पाणी NH-६६ हायवे वर येवुन पुर आला होता. यामुळे शेती, घरे, दुकाने, हॉटेल्स, वाहने, छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे तसेच स्थानिक रहिवाश्यांच्या घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे खूप नुकसान झाले होते. तसेच पुराचे पाणी वागदे येथे महामार्गावर ५ फुटापर्यंत शिरल्याने महामार्ग देखील खुप काळासाठी बंद होता. तसेच खारेपाटण येथे पुर आल्याने तेथील बाजारपेठ व आजूबाजूचा परीसर देखील पाण्याखाली जावून उध्वस्त झाला होता.
या २०२१ सालच्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे तसेच गेली कित्येक वर्षे या तीनही नद्यांमधील गाळ न काढल्याने या सर्व नदीपात्रांत मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. सदरचा गाळ त्वरीत न काढल्यास यावर्षी देखील अतिृष्टीमुळे पावसाचे पाणी नदिपात्राच्या बाहेर येवुन पूरस्थिती निर्माण होणारी आहे. पावसाळा जेमतेम १५ दिवसांवर आला आहे. काल देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे.
संभाव्य पुरस्थितीचा धोका टाळण्यासाठी कणकवली शहर गणपती साना ते कलेश्वर मंदिर परीसर, वागदे गडनदी, खारेपाटण नदी पात्रातील गाळ त्वरित काढन्याचे आदेश संबंधित यंत्रणेला द्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे कोकण पर्यटन विकास समिती उपाध्यक्ष श्री.संदेश पारकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली. त्यानंतर पालकमंत्री महोदयांनी उद्यापासूनच गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल असे आश्वासन श्री.पारकर यांना दिले.