*कोकण Express*
*कणकवलीतील मान्सूनपूर्व कामे त्वरित पूर्ण करा…*
*सुशांत नाईक ; मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शहरातील नालेसफाई, कचऱ्याचे नियोजन, गटारे निर्जंतूक करणे, डास फवारणी करणे, रस्त्यांवरील पडलेल्या खड्यांच्या यासह अन्य समस्यांबाबत शिवसेनेच्या
शिष्टमंडळाने न.पं.चे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची भेट घेत पावसाळासुरु होण्यापूर्वी करावी, अशी मागणी केली. यावर मुख्याधिकाऱ्यांनी ही कामे त्वरित पूर्ण
करण्यात येतील, असे आश्वासन शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.
यावेळी शिवसेनेचे गटनेते तथा जिल्हा बँकेचे संचालक सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, भूषण परुळेकर, तेजस
राणे, योगेश मुंज, सिद्धेश राणे, प्रणाम कामत आदी उपस्थित होते.
पावसाळा सुरु झाल्यानंतर शहरात ठिकठिकाणी पाणी साचते. परिणामी त्याचा नागरिकांना त्रास होत असतो. गेली दोन वर्षे सारस्वत बँक परिसरात पावसाचे
पाणी साचल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. शहरातील नालेसफाईची कामे वेळेत होत नसल्याने सांडपाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत
नाही. याशिवाय कचरा उचण्याचे काम घेतलेल्या ठेकेदाराकडून नियमित कचरा उचण्यास दिरंगाई होत असल्याने शहरात रोगराई पसरण्याची भीती आहे.
स्वच्छतेअभावी रोगराई पसरू नये म्हणून नालेसफाई करणे, कचरा उचलण्याचे नियोजन करणे, परिसर निर्जुतूक करणे व डासांची उत्त्पती वाढू नये म्हणून फवारणी
करणे आवश्यक आहे. याशिवाय शहरात रस्त्यांच्या नूतनीकरणीची जी कामे सुरु आहेत, परंतु जी कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार नाहीत, अशा रस्त्यांवरील
पडलेले खड्डे त्वरित बुजविण्याची गरज आहे यासह अन्य समस्यांबाबत सेनेच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधून ही कामे पावसाळा सुरु होण्यापूर्वी पूर्ण
करावीत, अशी मागणी केली.
न.पं.च्या जेसीबी ठेकेदाराच्या कामासांठी वापरला जात आहे. शहरातील किती गटारांची सफाई करण्यात आली आहे, याची माहिती देण्यात यावी. तसेच न.पं.च्या
सफाईकामगारांना ठरलेल्या वेतनापेक्षा कमी वेतन देण्यात येत आहे, ही बाब सुशांत नाईक व कन्हैया पारकर यांनी श्री. तावडे यांच्या निदर्शनास आणून दिली.
या संदर्भात चर्चा करताना मुख्याधिकारी व कन्हैया पारकर यांच्या शाब्दीक खटके देखील उडाले. सोनगेवाडीतील विविध समस्यांचा पाढा सुजित जाधव यांनी
मांडून या समस्या सोडविण्याच्यादृष्टीने त्वरित कृती करावी, अशी विनंती श्री. तावडे यांच्याकडे केली. शहरातील कचरा उचण्यासाठी सहा गाड्या आहेत, त्या
गाड्यांना जीपीएस प्रणाली बसविण्यात आली आहे. जीपीएस प्रणालीद्वारे कोणती गाडी कोणत्या ठिकाणी कचरा उचलण्यास गेली आहे, याची माहिती मिळत
असते. ही माहिती विरोधी गटाच्या सदस्यांना मिळावी, अशी मागणी श्री. पारकर यांनी केली.
उबाळे मेडिकल येथे पाईप घालून नैसर्गिक व कित्येकवर्ष चालू असलेला पाण्याचा प्रवाह बदलण्याचे काम चालू असून हे काम चुकीचे पद्धतीने सुरु असल्याने
आमची जमीन बाधित होणार असल्याची बाब प्रणाम कामत यांनी मुख्याधिकारी यांच्या निदर्शनास आणून देत हे काम त्वरित काम थांबविण्याची मागणी त्यांनी
केली. या संदर्भात श्री. तावडे यांनी कनिष्ठांना त्या कामाची पाहणी करून नेमकी वस्तुस्थिती काय आहे, याबाबत आपणास माहिती द्यावी, अशी सूचना त्यांनी
केली. उबाळे मेडिकल येथील नाला दुरुस्तीचे काम चुकीच्या पद्धतीने सुरु असल्याचे श्री. पारकर यांनी सांगितले.