*कोकण Express*
*भाजपाचे जुने निष्ठावान कार्यकर्ते राजन चिके यांचा तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भाजपाच्या कणकवली तालुका अध्यक्षपदीवर्णी लागलेले भाजपाचे जुने निष्ठावान कार्यकर्ते राजन चिके यांनी तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे त्यांनी तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती स्वतः चिके यांनी दिली आहे. मात्र वर्षभरापूर्वी नियुक्ती झाल्यानंतर चिके यांनी अचानक राजीनामा दिल्याने तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. काही दिवसांपूर्वी कणकवलीत माजी राज्यमंत्री व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांचा दौरा झाला. या दौ-या नंतर राजन चिके यांच्या राजीनाम्याबाबत घडामोडी घडल्याची चर्चा आहे. नुकतेच भाजपाचे बेळणे येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर झाले. त्यानंतर राजन चिके यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे या राजीनाम्यामागे वैयक्तिक कारण की अन्य काही असा प्रश्न उपस्थित होत आहे. राजन चिके हे भाजपाचे जुने कार्यकर्ते आहेत. कठीण काळातही त्यांनी भाजपा वाढीसाठी प्रयत्न करत पक्षासाठी योगदान दिले आहे. चिके यांना मानणारा मोठा वर्ग फोंडाघाट परिसरात आहे. फोंडाघाट सोसायटी व इतर संस्था ताब्यात ठेवण्यामध्ये ही त्यांचा मोलाचा वाटा आहे. अशा स्थितीत चिके यांनी राजीनामा दिल्याने तर्कवितर्कांना ऊत आला आहे. कणकवली तालुका भाजपचे दोन मंडळाचे दोन तालुका अध्यक्ष नियुक्त करण्यात आले होते. त्यात फोंडाघाट, नाटळ, हरकुळ आणि कणकवली शहर, मंडळासाठी राजन चिके तर उर्वरित भागासाठी संतोष कानडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली होती. आता त्यांच्या जागी तालुकाध्यक्ष म्हणून नवीन कोणाची नियुक्ती होतेय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.